कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार होतो तेव्हा सरकारकडून त्यावर कर आकारणी केली जाते. या करालाच मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) म्हटले जाते. निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेच्या व्यवहारावरावर मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते.
कसे ठरते मुद्रांक शुल्क?
योग्य मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मालमत्तेचा अलीकडचा बाजारभाव माहीत असणे आवश्यक आहे. ही माहिती मुद्रांक शुल्क रेडी रेकनरवरून मिळू शकते किंवा जिल्हाधिकारी, मुद्रांक शुल्क यांचे कार्यालयात सुद्धा वाजवी फी घेऊन मुद्रांक शुल्क ठरविण्याची व्यवस्था करते.
कुटुंबातील सदनिकेचे हस्तांतरण झाले असेल, कुटुंबातील सदस्यांमधील बक्षिसपत्राच्या बाबतीत अभिहस्तांतरणाशी संबंधित अनुच्छेद-२५ प्रमाणे मुद्रांक शुल्क लागते; परंतु पती-पत्नी एकमेकांना बक्षीस देत असतील किंवा आर्इ-वडील मुला-मुलीला, तसेच आज्जी-आजोबा नातू किंवा नातीला बक्षीस देत असतील तर २०० रुपये मुद्रांक शुक्ल आणि बाजार भावाच्या दोन टक्के सेझ भरावे लागते. हे केवळ निवासी मालमत्ता आणि शेतीला लागू आहे.
अनिवासी मालमत्तेच्या बाबतीत मग ती सहकारी संस्था असो वा नसो, बाजार मूल्यांच्या सरसकट पाच टक्के व दोन टक्के सेझ, असे एकूण सात टक्के शुल्क आकारले जाते.
मुद्रांक शुल्क उशिरा भरल्यास...
मुद्रांक शुल्काचा भरणा वेळेवर केला नाही तर तुटीच्या रकमेवर प्रति महिना दोन टक्के दराने दंड आकारला जातो. हा दंड मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रकमेवर जास्तीत जास्त २०० टक्क्यांपर्यंत आकारण्या येतो. कर माफी किंवा सवलतीसाठी कागदपत्रे उपनिबंधक/अधीक्षकांकडे दाखल केलेली असतील तर दंडाची रक्कम ही केवळ २५० ते ३०० रुपये आकारण्यात येते.