पारंपरिक प्रक्रियेला फाटा देऊन सरकारी आणि खासगी संस्था आता मोठ्या प्रमाणात ई-टेंडरिंगकडे वळताना दिसत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ई-टेंडरिंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. वापरातील सुलभता, पारदर्शकता आदी कारणांमुळे ई-टेंडरिंगला प्राधान्य दिले जात आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे टेंडरिंगची सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यामुळे ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती करून घेणे गरजेचे बनले आहे. या लेखातून आपण ई-टेंडरिंगच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.
प्रकल्पाचे स्वरुप नेमके काय आहे, तो प्रकल्प किती गुंतागुंतीचा आहे, आदी मुद्यांच्या आधारे टेंडरिंगचे वेगवेगळे प्रकार पडतात. संबंधित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी काही विशिष्ट कौशल्य गरजेची ठरतात, त्या आधारेही टेंडरचा प्रकार ठरतो. त्याच बरोबर टेंडरिंगच्या प्रक्रियेसाठीच्या नियमांवरूनही टेंडरचा प्रकार निश्चित केला जातो. साधारणपणे टेंडरिंगच्या प्रक्रियेमध्ये खालील तीन प्रकारांचा अवलंब करण्यात जातो.
ओपन टेंडर
सरकारी आणि खासगी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात ओपन टेंडरिंगचा वापर केला जातो. संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर टेंडरची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. या जाहिरातीत ज्या प्रकल्पासाठी टेंडर काढण्यात आले आहे त्या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या माहितीबरोबरच टेंडर दाखल करण्याची अंतिम तारीख, टेंडर मिळविण्यास पात्र ठरण्यासाठीच्या अटी, आवश्यक बयाणा रक्कम, टेंडरसोबर सादर करावयाची कागदपत्रे, आदीशी संबंधित माहिती दिलेली असते. ओपन टेंडर हे संस्थेच्या अधिकृत वेबसाईट बरोबरच खरेदीसाठीच्या सरकारी प्रकाशनांमध्ये आणि टेंडरला वाहिलेल्या पोर्टल्सवर प्रसिद्ध केले जातात. या प्रकारच्या टेंडरचा सर्वाधिक वापर केला जातो.
सिलेक्टिव्ह टेंडरिंग
सिलेक्टिव्ह किंवा निवडक टेंडरच्या प्रकारामध्ये काही मोजक्या, निवडक व्हेंडर्सकडूनच टेंडर मागविण्यात येतात. लिलावात करण्यात येणाऱ्या मागणीची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि निवड प्रक्रियेतील वेळ कमी करण्याच्या उद्देशाने या प्रकारचे टेंडर काढले जाते. टेंडर काढणाऱ्या संस्थेकडून निवडक व्हेंडर्सची यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीतील व्हेंडर्सलाच टेंडरची माहिती पाठविली जाते. ज्या प्रकल्पांना प्रचंड मोठ्या प्रमाणात विशिष्ट प्रकारच्या कौशल्यांची आणि अनुभवाची आवश्यकता असते, त्या प्रकल्पांसाठी सिलेक्टिव्ह टेंडरिंगचा वापर केला जातो.
निगोशिएबल टेंडरिंग
विशेष प्रकारच्या सेवांची आवश्यकता असलेल्या प्रकल्पांसाठी या पद्धतीच्या टेंडर वापर केला जातो. अभियांत्रिकी आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये या पद्धतीच्या टेंडरिंगचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या पद्धतीमध्ये ग्राहक थेट कंत्राटदारांशी संपर्क साधतात आणि प्रकल्पाची किंमत आणि इतर बाबींसंदर्भातील वाटाघाटी केल्या जातात. ही पद्धत मुख्यत्वे एकाच कंत्राटदारासाठी वापरली जाते. मात्र कधी कधी कंत्राटदारांची संख्या तीन पर्यंत वाढू शकते.