औरंगाबाद (Aurangabad) : ठेकेदार जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि त्याचा संबंधित प्रकल्प व्यवस्थापक तथा जागतिक बँक प्रकल्पातील सेवा निवृत्त अभियंता विवेक दुबे, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या जागतिक बँक प्रकल्प शाखेचे कार्यकारी अभियंता नरसिंह भंडे, उप अभियंता शरद सुर्यवंशी, शाखा अभियंता सुनिल कोळसे व या रस्त्यासाठी नेमलेला हरियानातील ग्लोबल इन्फोटेक कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुबडे यांच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणामुळे संक्रातीच्या दिवशीच रविवारी (१५ जानेवारी) रात्री आठच्या सूमारास बीडबायपासवर रस्त्यावर हिवाळे मंगल कार्यालयासमोर अपघातात एका २२ वर्षीय युवकाचा बळी गेला.
सातारा-देवळाईकरात संतापाची लाट
या दुर्देवी घटनेची वार्ता सातारा, देवळाई व बीडबायपास परिसरात वाऱ्यासारखी पसरताच, सातारा, देवळाई, बीडबायपास परिसर हादरला असून, हा दुर्देवी रस्ता अजून किती बळी घेणार, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या घटनेला संबंधित ठेकेदार आणि अधिकारीच जबाबदार असल्याचे म्हणत आता या भागातील संतप्त नागरिकांसह सातारा संघर्ष समितीचे सोमिनाथ शिराणे, आबासाहेब देशमुख, असद पटेल, विनोद जाधव,पद्मसिःह राजपुत, जनसेवा कृती समितीचे बद्रिनाथ थोरात, ॲड. शिवराज कडूपाटील, कांता कदम, व अन्य सेवाभावी संघटनेतील सदस्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विश्वसनीय सुत्रांकडून टेडरनामा प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेतली असता प्रमोद दरनदले या युवकाचा बळी गेल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असून, अनेक ठिकाणी सेवा रस्ता अर्धवट खोदून ठेवला आहे. अनेक ठिकाणी मातीचे ढिग अन् मुरूम, खडीचे ढीग पडलेले आहेत. प्रमोद दुचाकीवर वेगाने जात होता. अंधारात त्याला मातीचा ढिगारा दिसून आला नाही. तो मातीच्या ढिगाऱ्यावरून थेट सदोष पध्दतीने बांधलेल्या चारफुट उंच दुभाजकावर आदळताच कवटी फुटल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
'टेंडरनामा' व्यक्त केली होती शंका
गेल्या अडीच वर्षांपासून अत्यंत कासवगतीने आणि सदोष पद्धतीने होत असलेल्या येथील दुभाजक आणि संग्रामनगर पुलाच्या सदोष कामावर तसेच जिथे काम बंद आहे, अशा ठिकाणी कुठेही सावधानतेचे फलक नाहीत सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूने उघड्या नालीत मुरूम अथवा खडी भरली नाही, नालीच्या दोन्ही बाजूने रेडियम पट्टे अथवा कुठेही सावधानतेचे फलक नाहीत, रस्त्यावर पाणी देखील मारले जात नसल्याने बीडबायकरांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्त मालिका प्रसिद्ध केली. अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला. पण लाड पुरवणाऱ्या या ठेकेदाराला कोणत्याही लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला नाही. ठेकेदाराचा कामात हलगर्जीपणा व अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे गत आठवड्यात याच मार्गावर एक कार थेट नाल्यात जाऊन पडली होती. या रस्त्याच्या कासवगती कारभारामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे म्हणत नागरिकांमधून आजच्या दुर्देवी घटनेनंतर मोठा संताप व्यक्त करत हळहळ व्यक्त केली जात आहे.