नागपूर (Nagpur) : सहा वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी (Smart City) प्रकल्पातील रस्ते, ड्रेनेज, सिवेज लाईनची कामे बंद पडली आहेत. रस्त्यांसाठी केलेल्या खोदकामामुळे नागरिकांंना चिखलातून प्रवास करावा लागतो आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार कंपनीनेही हात वर केल्याचे समजते. या प्रकल्पातील निधी आता इलेक्ट्रिक बस, ई-रिक्षा खरेदी करण्यावर खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपुरातच त्यांच्यात महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडीचा काही भाग, असा एकूण १७३० एकरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. येथे ५५ किमीचे २४ व ३० फूटाचे रस्ते, ड्रेनेज, सिवेज लाईन, वाणिज्य संकुल, मैदान, बहुमजली इमारत आदी प्रस्तावित होते. या कामाला २०१८ मध्ये सुरवात झाली. हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु त्यानंतर कालावधी जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आला. जून महिना गेला तरी प्रकल्पाचे काम अद्याप निम्मेही झाले नाही. आता तर हा प्रकल्प पूर्व नागपुरातील नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी ठरला आहे. रस्त्यांची कामे, सिवेज लाईन, ड्रेनेज लाईनची कामे अपूर्ण आहे. याशिवाय रस्त्यांसाठी खोदकाम करून ठेवले. त्यामुळे चांगल्या रस्त्यांचाही बळी गेला असून नागरिकांना खड्डे, चिखलातून मार्ग काढावा लागतो आहे. या प्रकल्पाची कामे शापूर्जी या कंपनीला देण्यात आली होती. परंतु प्रकल्पासाठी अद्यापही जागेचे अधिग्रहण न झाल्याने कंपनीच्या कामाचा वेगही मंदावला. आता कंपनीचे कामच बंद झाल्याचे सुत्राने सांगितले.
अनेकांचे भूखंड प्रकल्पात गेले असून, त्यांंना मोबदला न मिळाल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. तूर्तास तरी प्रकल्प बंद झाल्याचे चित्र असून, या प्रकल्पासाठी आलेला निधी इलेक्ट्रिक बस, शहरात ई-टॉयलेट, ई-पोलिस बूथ आदीवर खर्च करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून ई-रिक्षाही खरेदी करण्यात आल्या असून त्या मेट्रो स्टेशनवर पडलेल्या अवस्थेत असल्याचे सुत्राने सांगितले. त्यामुळे निधीची विल्हेवाट लावणे एवढेच काम शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदार कंपनीने कामे बंद केले की स्मार्ट सिटी कंपनीने त्यांना कामे बंद करण्यास सांगितले, याबाबत स्पष्ट नसले तरी याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर पडला आहे. नागरिकही आता या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झाले आहेत.
आतापर्यंत चारशे कोटींवर खर्च
स्मार्ट सिटी प्रकल्पात वेगवेगळ्या एजन्सी काम करीत आहेत. परंतु एकाही एजन्सीकडून वेगाने काम होत नाही. जलकुंभ, रस्त्यांची कामे रखडली आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या कामावर सव्वाचारशे कोटी खर्च झाले. मात्र येथील नागरिकांच्या जीवनात कुठलाही बदल झाला नाही. केवळ बहुमजली इमारतीच्या प्रकल्पातील दोन इमारती पूर्ण झाल्या असून, तिसऱ्या इमारतीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.