मुंबई (Mumbai) : पावसाळा सुरू होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक असताना मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यांना गळती लागली आहे. सोमवारी सायंकाळी बोगद्यांच्या छतावरून पाणी टपकताना दिसले. तर, ओलसरपणामुळे भिंतींवर अनेक गडद डाग पडले होते. अंधारलेल्या डागांपासून जमिनीपर्यंत ठिबक रेषा तयार झाल्या होत्या. छिद्रांचा परीघ ओलसर दिसत होते. बोगद्यातून बाहेर पडण्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या मरीन ड्राईव्ह एंडच्या दिशेने कोस्टल रोडवर पाणी साचले होते.
रविवारी सकाळपासून ही गळती सुरू असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता गिरीश निकम यांनी दिली. "बांधकामाच्या सांध्यातून येणाऱ्या भिंतीत ओलसरपणा आहे. रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक सुरू असल्यामुळे तपासणी बाकी असल्याने नेमके कशामुळे बोगद्याला गळती लागली, यामागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत." रविवारी सकाळी ही गळती पहिल्यांदा समोर आल्यानंतर ती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सोमवारी गळती वाढली. या बोगद्याच्या बांधकामावेळी कार्यरत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राउटिंगचा वापर करून तो वॉटरप्रूफ करण्यात आला आहे, आणखी काही ग्राउटिंगची आवश्यकता असू शकते. परंतु, गळतीची तपासणी होईपर्यंत त्यांनी पुढील निर्णय राखून ठेवला. यापूर्वी १० एप्रिल रोजी हाजी अली कोस्टल रोडच्या पादचारी अंडरपासमध्ये भरतीचे पाणी शिरले होते. यावर पाणी साचू नये म्हणून महानगरपालिकेने काही उपाय शोधले आहेत, असे सांगितले होते.
मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे ११ मार्च २०२४ रोजी उद्घाटन केले. हा देशातील पहिला रस्ता आहे, जो समुद्राच्या आत बांधण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याचे काम मुंबई महापालिकेने केले आहे. याआधी वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर गाठण्यासाठी मुंबईकरांना ४० मिनिटे लागायची. मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर प्रवाशी अवघ्या ९ ते १० मिनिटात हे अंतर गाठत आहे. परंतु, पावसाळ्याच्या दोन आठवडे आधीच मुंबई कोस्टल रोड बोगद्यातून गळती सुरू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गळतीमुळे मुख्य बांधकामाला कोणताही धोका नाही : मुख्यमंत्री
कोस्टल रोड मार्गात अनेक ठिकाणी पाणी गळती लागल्याने याबाबतचे वृत्त अनेक वाहिन्यांमध्ये दाखवण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त चक्रधर कांडलकर यांच्यासह कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता आणि संबंधित कंपनीचे पदाधिकारी व तज्ज्ञ मंडळींसह प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर शिंदे यांनी या गळतीमुळे मुख्य बांधकामाला कोणताही धोका नसून केवळ जोडणीच्या ठिकाणांहून पाण्याची गळती होत आहे. दोन ते तीन ठिकाणी जोडणीच्या ठिकाणी गळती दिसून येत आहे. त्यामुळे या गळतीमुळे बांधकामाला कोणताही धोका नसून इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊंटींग केल्यास याचे निवारण केले जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले, असे शिंदे यांनी सांगितले.
मात्र, असे जरी असले तरी या केवळ दोन ते तीन ठिकाणांऐवजी दोन्ही मार्गिकांमधील प्रत्येकी २५ ठिकाणी असलेल्या जोडणीच्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊंटींग केले गेले पाहिजे अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जाणार आहे. मात्र, बांधकामाला धोका असता तर वाहतुकीसाठी मार्गिका बंद केली असती, पण येथील वाहतूक बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या ग्राऊंटींगचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आपण आरोप प्रत्यारोपांमध्ये जात नसून यामुळे लोकांसाठी कोणताही धोका नसून ग्राऊंटींग केल्यास ही गळतीही कायमची बंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता कोस्टल रोडवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. एक्स वरील आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी, ‘मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता. पण, भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले’, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. ‘फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते, आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरू होते. शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत 1 लेन उघडण्यात आली. 1 लेन, जी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच खुली असते! मग आम्हाला नवीन टाईमलाइन देण्यात आली. आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आला आहे. मुंबई महापालिका नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ‘जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच!’, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.