मुंबई (Mumbai) : नवी मुंबईत (Navi Mumbai) कोट्यावधींचा पार्किंग (Parking) घोटाळा उघडकीस आला आहे. काही रेल्वे स्टेशन परिसरातील वाहनतळांच्या ठेक्यांची मुदत संपली असली तरी कंत्राटदारांची वसुली मात्र जोमात सुरु आहे. दुर्दैवाने, यात विनाकारण नागरिकांना लाखो करोडोंचा भुर्दंड बसत असूनही सिडको प्रशासनाचे मात्र या बेकायदेशीर वसुलीकडे साफ दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईतील वाहनतळ खासगी कंत्राटदारांना आंदण दिले आहेत का, असा सवाल केला जात आहे. सिडकोतल्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन हा गोरखधंदा सिडकोच्या नाकाखाली दिवसाढवळ्या सुरु असल्याचे दिसून येते.
नवी मुंबई आणि परिसरातील काही लाख नागरिक दररोज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लोकल रेल्वेने प्रवास करतात. बहुतांश नागरिक स्वतःची दुचाकी, चारचाकी वाहने रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांवर पार्क करतात. त्यापोटी पार्किंग कंत्राटदार वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. नवी मुंबईतील सिडको हद्दीतील वाहनतळांचे ठेके सिडको प्रशासनाकडून खासगी कंपन्यांना दिले जातात.
मात्र, गेली महिनोंमहिने नवी मुंबईतील काही वाहनतळांवर पार्किंगच्या नावाने बेकायदेशीर वसुली सुरु आहे. पनवेल रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खारघर रेल्वे स्टेशन आणि खारघरमधील लिटील वर्ल्ड मॉल परिसरातील वाहनतळ हे सगळे मोक्याच्या ठिकाणचे पार्किंग लॉट आहेत. याठिकाणी यापूर्वी ज्या कंपन्यांना ही कंत्राटे मिळाली आहेत, त्यांची मुदत केव्हाच संपली आहे. दररोज काही हजार वाहने या सर्व वाहनतळांवर पार्किंगसाठी येत असतात. त्याचा विचार करता हा पार्किंग घोटाळा किती मोठा आहे याची कल्पना येते. तसेच हा घोटाळा सिडकोतल्या अधिकारी आणि कंत्राटदारांमधील संगनमताने अगदी बिनबोभाटपणे सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सुनील शिरीषकर यांनी माहिती अधिकारातून हा महाघोटाळा उघडकीस आणला आहे.
१) लिटील वर्ल्ड मॉल खारघर पार्किंग - कंत्राटदार मेसर्स व्ही सी पाटील एन्टरप्रायझेस
स्टेट्स :
* माहिती अधिकारानुसार शेवटची मुदतवाढ १९/१२/२०१९ रोजी देण्यात आली आहे. त्यानंतर मुदतवाढ दिल्याचे पत्र अथवा माहिती देण्यात आली नाही.
* सध्या मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. अद्यापही मुदतवाढ दिलेली नाही.
२) खारघर रेल्वे स्टेशन पार्किंग - कंत्राटदार मेसर्स रंजना एन्टरप्रायझेस
स्टेट्स :
* १९/३/२०२१ रोजी सहा महिन्यांसाठी करारनामा झाला आहे.
* २२/३/२०२१ रोजी करारनामा मुदत संपली आहे.
* माहिती अधिकारानुसार उपलब्ध कागदपत्रात त्यानंतर मुदतवाढ दिल्याचे पत्र अथवा माहिती देण्यात आलेली नाही.
३) मानसरोवर रेल्वे स्टेशन पार्किंग - कंत्राटदार मेसर्स जयमल्हार एंटरप्राइझेस
स्टेट्स :
* २६/७/२०१८ ते २६/७/२०२१ ही तीन वर्षांंची करारनामा मुदत संपली आहे.
* मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरुच आहे.
* माहिती अधिकारानुसार सिडकोने मेसर्स जयमल्हार एंटरप्राइझेसला पार्किंग कंत्राटाची मुदतवाढ दिलेली नाही.
* या वाहनतळांवर दररोज दहा हजार ते बारा हजार दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंगसाठी येतात. गेली काही महिने याठिकाणी बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरुच आहे.
* तसेच ही पार्किंगची जमीन शापूरजी पालनजी यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दिली असतानाही संबंधित ठेकेदाराने जागा मोकळी करुन दिलेली नाही.
४) खांदेश्वर रेल्वे पार्किंग - कंत्राटदार मेसर्स शक्ती कंस्ट्रक्शन
स्टेट्स :
* या ठेक्याची मुदत, करारनामा संपला आहे.
* १३/५/२०२० नंतर मुदतवाढ दिलेली नाही.
* माहिती अधिकारानुसार उपलब्ध कागदपत्रात करारनामा संपल्यानंतर ठेक्याला मुदतवाढ दिल्याचे पत्र अथवा माहिती देण्यात आलेली नाही.
५) पनवेल रेल्वे स्थानक पार्किंग : कंत्राटदार मेसर्स व्ही सी पाटील एन्टरप्रायझेस
स्टेट्स :
* २६/३/२०१८ रोजी तीन वर्षांकरिता करारनामा करण्यात आला.
* २६/३/२०२१ रोजी कंत्राटाची मुदत संपली आहे.
* मुदतीनंतरही गेली काही महिने बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरुच आहे. या वाहनतळांवर दररोज पाच हजार ते सात हजार दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंगसाठी येतात.
* माहिती अधिकारानुसार उपलब्ध कागदपत्रात करारनामा संपल्यानंतर मेसर्स व्ही सी पाटील एन्टरप्रायझेस यांना मुदतवाढ दिल्याचे पत्र अथवा माहिती देण्यात आलेली नाही.