मुंबई (Mumbai) : कोविड साथीमुळे गेल्या दोन वर्षांत पगार कपात सहन केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षी सरासरी ८.१३ टक्के पगारवाढ मिळण्याचा अंदाज 'टीमलीज'ने वर्तवला आहे. 'टीमलीज'ने नुकत्याच जारी केलेल्या आर्थिक वर्ष २०२२ साठीच्या नोकऱ्या आणि पगार विषयक अहवालात ही माहिती दिली आहे. १७ क्षेत्रे आणि नऊ शहरांमधील २ लाख ६३ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन विचारात घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
कोविड संकटाचा भर ओसरल्याने अर्थव्यवस्थाही रुळावर आली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वच क्षेत्रात पगार वाढीसाठी अनुकूल स्थिती दिसत आहे. यंदा मध्यम स्वरुपातील का होईना पगार वाढ मिळेल. 'टीमलीज'ने आढावा घेतलेल्या १७ क्षेत्रांपैकी १४ क्षेत्रांनी एक अंकी पगार वाढीला अनुकूलता दर्शविली असून, सरासरी ८.१३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
२०२०-२१ मध्ये १७ पैकी फक्त पाच क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या, मात्र २०२२मध्ये जवळपास नऊ क्षेत्रांमध्ये अशा नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सध्या विशेष कौशल्यांची गरज असणाऱ्या सूपर-स्पेशलाइज्ड नोकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या वर्गातील नोकऱ्या ११ ते १२ टक्क्यांनी वाढत आहेत. त्यांच्या पगार वाढीचा दरही आधिक आहे.
ई-कॉमर्स, तंत्रज्ञान आधारीत स्टार्ट-अप, आरोग्यसेवा,आयटी अशा काही क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, तर कृषी, रसायने, वाहन, बँकिंग, वित्तीय सेवा,विमा, बीपीओ आणि आयटी सेवा, बांधकाम, रिअल इस्टेट, शैक्षणिक सेवा, कंझ्युमर गुड्स, हॉस्पिटॅलिटी, औद्योगिक उत्पादन, मनोरंजन, माध्यम, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्रात १० टक्क्यांपेक्षा कमी वाढ मिळण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे ही शहरे सर्वात जास्त १२ टक्के आणि त्याहून अधिक वाढ देणारी आहेत.
अद्याप पगार वाढ दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचली नसली तरी गेल्या दोन वर्षांतील पगारातील कपात किंवा आहे तेवढाच पगार मिळण्याचा टप्पा संपत आला आहे, ही बाब आनंददायी आहे. नोकऱ्यांच्या बाजारपेठेतील स्थिती सुधारत आहे, त्यामुळे लवकरच पगार वाढीचे प्रमाण कोविड पूर्व काळातील स्तर गाठेल.
- रितूपर्णा चक्रवर्ती, सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष, टीमलीज सर्व्हिसेस