मुंबई (Mumbai) : बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T) आणि माइंडट्री (Mindtree) यांच्या विलीनीकरणावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रो लिमिटेडने त्यांच्या माइंडट्री आणि लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (एलटीआय) या दोन सॉफ्टवेअर कंपन्यांच्या विलीनीकरणाची नुकतीच घोषणा केली आहे. हा व्यवहार ९ ते १२ महिन्यांत पूर्ण होईल. नवीन कंपनीचे नाव एलटीआयमाइंडट्री असेल. माइंडट्रीच्या १०० शेअरसाठी एलटीआयचे ७३ शेअर दिले जातील, अशी माहिती लार्सन अँड टुब्रोच्या वतीने देण्यात आली.
लार्सन अँड टुब्रोने २०१९ मध्ये माइंडट्रीचा ६१ टक्के हिस्सा घेतला, तर लार्सन अँड टुब्रोकडे लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचा ७४ टक्के हिस्सादेखील आहे. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचे बाजार भांडवल १.०३ लाख कोटी आहे, तर माइंडट्रीचे बाजार भांडवल ६५ हजार २८५ कोटी आहे. त्यांचा एकूण महसूल अंदाजे ३.५ अब्ज डॉलर आहे.
विलीनीकरणानंतर, नवीन कंपनीची उलाढाल कंपनी ३५० दशलक्ष डॉलर होईल. त्यामुळे बाजार भांडवलाच्या पातळीवर टेक महिंद्राला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची आयटी सेवा प्रदाता कंपनी बनणार आहे. ही कंपनी ४००० विक्री प्रतिनिधिंसह ८० हजार लोकांना रोजगार देईल. सध्या, सर्वोच्च बाजार मूल्यमापन असलेल्या IT कंपन्यांमध्ये TCS पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो यांचा क्रमांक लागतो.
एलटीआयचे एमडी संजय जलोना राजीनामा देणार आहेत. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे ते राजीनामा देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. माइंडट्रीचे सीईओ आणि एमडी देबाशिस चॅटर्जी नवीन कंपनीचा कार्यभार स्वीकारतील.
विलीनीकरणाबाबत बोलताना एल अँड टी ग्रुपचे अध्यक्ष ए. एम. नाईक म्हणाले, “हे विलीनीकरण आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनानुसार आयटी सेवा व्यवसाय वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार आहे. विलीनीकरण ग्राहक, गुंतवणूकदार, भागधारक आणि कर्मचारी यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.