मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) आणि कळवा (Kalwa) या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलाच्या कामाला यापूर्वी मुदतवाढ देऊनही पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या पुलाची एक मार्गिका मे महिनाअखेपर्यंत सुरू करण्याचे संकेत ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) आयुक्त डॉ. विपीन शर्मा (Vipin Sharma) यांनी सोमवारच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. यामुळे पुलाच्या कामासाठी पुन्हा नवीन मुदत देण्यात आल्याचे चित्र असून या वेळेत तरी मार्गिका खुली होईल का, असा प्रश्न आहे.
ठाणे आणि कळवा शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. त्यापैकी जुना धोकादायक झालेला ब्रिटिशकालीन खाडीपूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी नवीन खाडी पुलाच्या उभारणीचे काम सुरू केले होते. कोरोना टाळेबंदी आणि निर्बधांचा फटका पुलाच्या कामाला बसला होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे पुलाचे काम धिम्या गतीने सुरू होते. यामुळे यापूर्वी ठरवून दिलेल्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नव्हते.
तिजोरीत असलेला खडखडाट आणि हजारो कोटी रुपयांचे दायित्व यामुळे गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मोठ्या प्रकल्पांचा मोह आवरता घेत आधीपासून रेंगाळलेले प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर भर दिला होता. त्यात कळवा नवीन खाडी पुलाचे काम सप्टेंबर २०२१ च्या अखेरीस पूर्ण करण्याची नवी मुदत त्यांनी आखून दिली होती. ठेकेदाराला निधीची चणचण भासू नये, यासाठी टप्प्याटप्प्याने निधीवाटपाचे नियोजनही केले होते. प्रत्यक्षात मात्र ही मुदत उलटूनही पुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली होऊ शकलेली नाही. असे असतानाच या पुलाच्या कामाचा वेग वाढवून मे महिनाअखेपर्यंत पुलाची एक मार्गिका कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. शर्मा यांनी सोमवारच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना केल्या. यामुळे या पुलाच्या कामासाठी आता नवीन मुदत देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
नवीन खाडी पुलाची लांबी ३०० मीटरची आहे. या पुलावर क्रिक नाका आणि कोर्ट नाक्याहून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका उभारण्यात येत आहे. तसेच साकेतकडून येणाऱ्या वाहनांसाठी वर्तुळाकार मार्गिका उभारण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. पादचाऱ्यांकरिता स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्याचबरोबर विद्युतीकरण आणि सुशोभीकरण अशी कामे करण्यात येत असून असे एकूण २.४० किमी पुलाचे बांधकाम असणार आहे. त्यापैकी क्रिकनाका येथून बेलापूर या मार्गिकेचे काम मे महिना अखेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आखले जात असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली.