मुंबई (Mumbai) : अखेर ठाणे महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईसाठी महापालिकेकडून बांधकामांचा आढावा घेऊन नियोजन करण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेकायदा बांधकामांवरील कारवाईला सुरूवात होणार आहे.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या विषयाला 'टेंडरनामा'ने राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वाचा फोडली आहे. "ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमागे २०० रुपये चौरस फूट रेट फिक्स" हे वृत्त टेंडरनामाने प्रसिद्ध केले. त्यानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. तसेच आव्हाड यांनी या अनधिकृत बांधकामांमागचे अर्थकारण सुद्धा उघड केले आहे. अलीकडेच पालकमंत्र्यांनी सुद्धा ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतीच एक बैठक घेऊन त्यात बेकायदा बांधकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या तसेच येत्या काळात पूर्णत्वास येऊन अव्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा देऊ नये, असे निर्देशही त्यांनी टोरंट वीज कंपनीला दिले आहेत. वीज पुरवठा दिलेले अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना घडून जिवीत व वित्तहानी झाली तर, त्यास टोरंट कंपनीचे सर्व अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंत्यास दिले आहेत. त्यापाठोपाठ आता महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा बांधकामांचा आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरू केली आहे. यानुसार नव्याने सुरु झालेल्या बांधकामांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. सुरूवातीला पहिल्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकामे झालेल्या आणि त्यानंतर पूर्णत्वास आलेल्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात सर्वाधित बेकायदा बांधकामे सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या हाती आली असून या भागातील बांधकामांपासून कारवाईला सुरूवात होणार आहे.