स्वच्छतागृहे कागदावरच अन् जाहिरातीचा धंदा मात्र जोरात

Thane
ThaneTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला खासगी कंपन्यांमार्फत स्वच्छतागृहे उभारून त्यावरील जाहिरातींचे हक्क त्यांना देण्याची योजना ठाणे महापालिकेने आखली होती. मात्र, या योजनेतील ३० पैकी १९ स्वच्छतागृहांचे काम अद्याप रखडले आहे. मात्र, काही बंद स्वच्छतागृहांच्या जागेत जाहिरातींचा धंदा तेजीत सुरु आहे.

Thane
'मिठी'चा ओव्हरफ्लो रोखण्यासाठी १६०० कोटींचा ऍक्शन प्लान

स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून महापालिकेने शहरात खासगी लोकसहभागातून स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित ठेकेदाराला जाहिरात हक्क देऊन त्याच्याकडून स्वच्छतागृहांची बांधकामे करून घेतली जाणार होती. या योजनेत दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच एकूण ३० स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार होती. घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बाळकुम, ठाणे शहर, कॅडबरी चौक, कळवा आणि मुंब्रा या भागांमध्ये ही स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन होते. ही स्वच्छतागृहे उभारणीची कामे पूर्ण झालेली नसतानाही ठेकेदाराने जाहिरात फलक उभारून व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार अगदी सुरुवातीलाच उघडकीस आला. तेव्हापासूनच ही योजना वादग्रस्त ठरली.

Thane
'समृद्धी'वर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी तब्बल 'इतके' कोटी खर्च

ठाणे शहरातील मानपाडा, माजिवाडा, बाळकुम तसेच इतर भागांमध्ये अशा स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली असली तरी मानपाडा आणि बाळकुम भागातील स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. मानपाडा शौचालयाला टाळे लावण्यात आलेले आहे. असे असतानाही शौचालयांच्या बाजूला ठेकेदाराने उभारलेल्या जाहिरात फलकांवर मोठ्या जाहिराती झळकताना दिसतात. नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेली स्वच्छतागृहे बंद अवस्थेत असताना दुसरीकडे ठेकेदाराचे मात्र चांगभलं होत आहे. याकडे महापालिका प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे.

Thane
मुंबई महापालिका १०० रुग्णालयांचे रुपडे पालटणार; नेमणार सल्लागार

ठाणे महापालिका महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांच्या कडेला नागरिकांच्या सोयीसाठी जाहिरात हक्क देऊन ३० स्वच्छतागृहे उभारण्यात येणार होती. त्यासाठी नेमलेल्या दोन ठेकेदारांनी आतापर्यंत ११ शौचालयांची उभारणी केली असून त्यातील सहा ते सात शौचालये सुरू झाली आहेत, उर्वरित स्वच्छतागृहे लवकर सुरू करण्यात येतील, असे महापालिकेच्या जाहिरात विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com