मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०० द.ल.लि. (एमएलडी) क्षमतेचा व ४०० द.ल.लि.पर्यंत वाढवता येणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ (Tender Scam) सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. ४००० कोटींच्या या प्रकल्पासाठी केवळ दोनच कंपन्यांनी टेंडर भरली आहेत.
मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करून मागणी आणि पुरवठा यामधील तूट कमी करण्याकरिता विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे २०० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नि:क्षारीकरण (डीसॅलिनेशन) प्रकल्प ४०० द.ल.लि. प्रतिदिनपर्यंत विस्तारित क्षमतेसह बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
गवार कन्स्ट्रक्शनने वेओलिया (Veolia) या कंपनीबरोबर तंत्रज्ञान भागीदार म्हणून अर्ज भरला आहे. परंतु भागीदारी संदर्भातील करार दर्शवलेला नाही. केवळ गवार कन्स्ट्रक्शनच्या लेटरहेडवर भागीदारी असल्याचे कळवले आहे. वेओलियाचे याबाबत कोणतेही संमतीपत्र नाही.
भागीदारी करार सादर न करणे तसेच भागीदारीतील प्रमाण जाहीर न करणे हे टेंडर नियमावलीचा भंग आहे. हा प्रकार पूर्णपणे संघटित भ्रष्टाचाराचा नमुना आहे. केवळ दोन अर्जदार दाखवण्यासाठी हे केले आहे.
या प्रकल्पाच्या सल्लागाराने या टेंडर प्रक्रियेवर हरकत घेतली असल्याचे व त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे समजते, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
या प्रकारात आयडीई (IDE) या कंपनीला हे काम देण्यासाठी तिसऱ्यांदा टेंडर काढण्यात येत आहे. एसडब्ल्यूसीसी (SWCC), ग्लोबल ओनमियम (Global Omnium), यूटीको (UTICO), सुएझ (SUEZ), अबेनगो (ABENGOA), टेक्टोन (TECTON), वाबाग (WABAG) यांसारख्या आयडीई IDE पेक्षा मोठ्या कंपन्यांना यात सहभागी होऊ दिले जात नाही, अशी तक्रार आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी या माहितीमध्ये तथ्य आहे की नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असे दिसत असेल तर तात्काळ हे टेंडर रद्द करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरणे होऊ देता कामा नये, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी करण्यात आलेले आरोप काल्पनिक आहेत. अद्याप टेंडर प्रक्रिया संपलेली नाही. ठेकेदारांची छाननी, मूल्यमापन अद्याप सुरू आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.