मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाच्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी तांत्रिक टेंडर गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी ७ किलोमीटरचा भाग समुद्राखाली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवत आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या सी-2 पॅकेजसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन टेंडर प्राप्त झाली आहेत. तांत्रिक मूल्यमापनानंतर आर्थिक टेंडर उघडली जातील.
२१ किलोमीटर लांबीच्या बोगदा जमिनीच्या खाली २५-४० मीटर खोलीपर्यंत १३.३ मीटर व्यासाचा एकल-ट्यूब ट्विन-ट्रॅक संरचना असा असेल. त्याच्या २०.३७ किलोमीटर लांबीपैकी, तीन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) १५.४२ किलोमीटरची रचना तयार करतील, तर उर्वरित ४.९६ किलोमीटर लांबीचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनुसार केले जाईल. बोगदा ठाणे खाडी ओलांडून जाईल आणि खाडीखालील सर्वेक्षणाचे काम पाण्याखालील स्थिर अपवर्तन तंत्र वापरून केले गेले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. एनएचएसआरसीएलने महाराष्ट्रातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विरार, बोईसर आणि ठाणे स्थानकांच्या दर्शनी भागाचे डिझाईन्स प्रदर्शित केले आहेत.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचा मार्ग १५६ किलोमीटर इतका आहे. पहिल्या टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे टेंडर यापूर्वीच निघाले आहे. बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा 21 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून 7 किमीचा हा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट आहे.