मुंबई (Mumbai) : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक बसेसच्या ५ हजार कोटींचे टेंडर मिळविण्यात यश मिळवले आहे. 5,450 इलेक्ट्रिक बसेसच्या या टेंडरसाठी टाटा मोटर्सने सर्वात कमी बोली लावली आहे. या टेंडरचा कालावधी 12 वर्षे इतका आहे. विशेष म्हणजे, या टेंडरद्वारे तब्बल 25,000 नोकऱ्यांच्या संधी निर्माण होणार आहेत, त्यापैकी सुमारे 10% या फक्त महिलांसाठी राखीव असणार आहेत. खरेदी केलेल्या बस दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, सूरत आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये धावणार आहेत.
केंद्राच्या फेम २ (FAME II) या योजनेअंतर्गत कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL) द्वारे हे टेंडर काढण्यात आले होते. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक बस पुढील 12 वर्षांसाठी सुमारे 4.71 अब्ज किलोमीटर चालतील. या इलेक्ट्रिक बसमुळे 1.88 अब्ज लिटर इंधनाची बचत होण्यास मदत होईल, तसेच 3.31 दशलक्ष टन सीओटू (CO2) टेलपाइप उत्सर्जन होईल, ज्यामुळे हवामान बदल कमी होईल.
टाटा मोटर्स व्यतिरिक्त, स्विच मोबिलिटी (अशोक लेलँडचा ईव्ही विभाग), व्हीईसीव्ही (आयशर मोटर्स आणि व्होल्वो ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम), आणि ऑलेक्ट्रा ग्रुपच्या एव्ही ट्रान्स यांनी इलेक्ट्रिक बसेसच्या टेंडरमध्ये भाग घेतला. ही प्रक्रिया पाच श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि सर्व श्रेणींमध्ये सर्वात कमी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या कमी बोली लावणाऱ्यांमध्ये सुमारे 10 रुपयांचा फरक होता.
टेंडरसाठी पाच श्रेणींमध्ये 12-मीटर लो-फ्लोअर एसी आणि नॉन-एसी, 9-मीटर स्टँडर्ड-फ्लोर एसी आणि नॉन-एसी आणि 12-मीटर स्टँडर्ड-फ्लोर नॉन-एसी बसेसचा समावेश होता. 12-मीटर लो-फ्लोअर नॉन-एसीसाठी, टाटा मोटर्सने रु. 43.49/किमी प्रति वाहन, तर 12-मीटर स्टँडर्ड-फ्लोर एसीसाठी, रु. ४४.९९/किमी. 9-मीटर स्टँडर्ड-फ्लोर एसी आणि नॉन-एसी सारख्या बसेससाठी अनुक्रमे रु. ४१.४५/किमी आणि रु. 39.21/किमी इतकी बोली लावण्यात आली होती. यासंदर्भात टाटा मोटर्सने आनंद व्यक्त केला आहे. कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL) च्या प्रतिष्ठित टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारे आहोत हे जाणून आनंद झाला आहे. टाटा मोटर्स देशभरात ग्रीन, सुरक्षित आणि टिकाऊ वाहतूक उपाययोजना करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही टाटा मोटर्सने म्हटले आहे.