नागपूर (Nagpur) : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बस चालवण्याचे धाडस करणाऱ्या एसटी महामंडळाला फायद्यापेक्षा तोटाच जास्त होत आहे. या मार्गावर प्रवास करताना एसटीचे टोलटॅक्समुळे डिझेलचाही खर्च निघत नसल्याने एसटीला आता जुनाच रस्त्यावरून धावावे लागणार असल्याचे दिसते.
समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुला केल्यानंतर एसटीने नागपूर-शिर्डी बससेवा सुरू केली होती. समृद्धीचे कुतहूल आणि रस्ता बघण्यासाठी प्रवाशांनी या बसमध्ये गर्दी केली होती. आता प्रवाशांची नवलाई संपली आहे. निम्मी रिकामी बस शिर्डीपर्यंत नेतांना एसटीला आता डिझेलचा खर्चा परवडेनासा झाला आहे.
आधीच एसटी महामंडळ तोट्यात आहे. करोनामुळे सुमारे दोन एसटीची चाके बंदच होती. अद्यापही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे. दुसरीकडे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत आहे. आघाडीच्या कार्यकाळात याकरिता मोठे आंदोलन करण्यात आले होते. सरकारला आंदोलन शांत करण्यात यश आले असले तरी उत्पन्नाचे स्रोत आणि त्यात काही वाढत नसल्याने एसटी आधीच चिंतेत आहे. त्यामुळे समृद्धी मार्गावरून प्रवास करणे एसटीला झेपणार नाही असेच दिसून येते. नुकसान टाळण्यासाठी एक प्रवाशी भाडेवाढ करावी लागेल. मात्र त्यामुळे प्रवाशांची संख्या घटण्याची दाट शक्यता असल्याने एसटी महामंडळासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. नागपूरहून शिर्डी आणि नागपूरहून औरंगाबादसाठी दररोज सकाळी नऊ वाजता सुटणाऱ्या बसेसला प्रवासी मिळत नाही. ४५ आसनी बसमध्ये सरासरी १० ते २० प्रवासी असतात. उर्वरित २० प्रवाशांचा खर्चाचा भुर्दंड एसटीला सोसावा लागत आहे.
टोल टॅक्सच ६ हजार रुपये
समृद्धीवरून जाणाऱ्या एसटीला एका बसमागे सहा हजारांचा टोल टॅक्स द्यावा लागतो. याशिवाय डिझेल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि ओटीची रक्कम मिळून बस चालविण्यासाठी १२ ते १५ हजारांपर्यंत खर्च येत आहे. प्रति प्रवासी सुमारे एक हजार रुपये भाडे घेतल्या जाते. सरारी १५ प्रवाशी बसले तर 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर एसटीची सेवा सुरू आहे. मात्र अर्थकारणाचा विचार केल्यास जास्त दिवस या तत्त्वावर व्यवसाय करता येत नाही.
कशी चालणार मुंबईसाठी एसटी?
नागपूरहून मुंबईला दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेषत: सणांच्या दिवसांत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या खचाखच भरलेल्या असतात. अशा स्थितीत प्रवाशांना जाण्यासाठी दुसरा पर्याय उरलेला नाही. यासाठीच मुंबईसाठी समृद्धीसह एसटी चालवण्याचा विचार सुरू आहे. मात्र, अशाच प्रकारे या मार्गावर बसेसचा तोटा होत राहिला, तर मुंबईसाठी बस चालवण्यास प्रशासन क्वचितच राजी होईल.