मुंबई (Mumbai) : बिहारमधील भागलपूर येथील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम केलेल्या 'मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि.' कंपनी मुंबईतील गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल आणि उन्नत पुलासोबत रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकाम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, कंपनीने हे टेंडर १०० कोटी कमी दराने घेतले असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गोरेगावमधील रत्नागिरी हॉटेल चौकमधील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा परिसरातील प्रस्तावित उच्चस्तरीय उन्नत मार्ग आणि डॉ. हेडगेवार चौकातील सहापदरी उड्डाणपुलाच्या कामांचे ५८४.२७ कोटी रकमेचे टेंडर 'एस. पी. सिंगला' कंपनीस देण्यात आले आहे. सध्या हे काम सुरू असून हे काम करणारा ठेकेदार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासोबत अलिबागला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकामही 'एस. पी. सिंगला' कंपनी करीत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पुलाचे टेंडर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित कंपनीला दिले आहे.
'एस. पी. सिंगला' कंपनी बांधत असलेल्या बिहारमधील भागलपूर येथील कोसी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे चार खांब ४ जून रोजी कोसळले. यापूर्वीही काम सुरू असताना हा पूल कोसळला होता. त्यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांच्या चौकशीची मागणी होत आहे. तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बिहारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनीविरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत रेवस-करंजाच्या कामास स्थगिती द्यावी किंवा टेंडर रद्द करून नव्याने टेंडर मागवावे, अशी मागणी होत आहे.
करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे टेंडर 'एस. पी. सिंगला' कंपनीने १०० कोटी कमी दराने घेतले आहे. २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे ७९७ कोटी ७७ लाखांचे हे टेंडर आहे. ११.१३ टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या 'एस. पी. सिंगला' कंपनीला हे टेंडर मिळाले. या टेंडरची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून 'एस. पी. सिंगला'ने १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. या टेंडरच्या स्पर्धेत 'एस. पी सिंगला' ७९७.७७ काेटी, लार्सन ॲण्ड टुब्रो ८७३.१० काेटी, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ८८८.०० काेटी, रेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० काेटी, ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० काेटी, अशोका बिल्डकॉन १२८९.७० काेटी या कंपन्या होत्या.