मुंबई (Mumbai) : 'ब्रिस्क इंडिया' कंपनी ही मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लाँडरींग झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपकडून (BJP) करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा आणि कोल्हापूर दौरा या माध्यमातून रान उठवले आणि आज याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसहतीगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समाज माध्यमाद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील सामाजिक न्याय विभागाने विरोध झुगारून वादग्रस्त 'ब्रिस्क इंडिया' कंपनीसह सत्ताधारी नेत्यांच्या कंपन्यांना भोजन पुरवठा टेंडरची दिवाळी भेट दिली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सद्यस्थितीत ४४३ शासकीय वसतिगृहे तसेच, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एकूण ९३ शासकीय निवासी शाळा सुरू आहेत. या शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्याचे हे टेंडर आहे. वर्षाला साधारण ३५० कोटींचे हे टेंडर आहे. ठेकेदारांना ३ वर्षांचे सुमारे १,०५० कोटींचे टेंडर आहे.
ईडीच्या कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेल्या 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचे काम दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 'ब्रिस्क इंडिया' कंपनीवर मनी लाँडरिंगचे आरोप केले होते. संबंधित मंत्र्यांच्या साखर कारखान्याच्या उभारणीत 'ब्रिस्क इंडिया' कंपनीने मनी लाँडरिंग केले, असा सोमय्या यांचा आरोप आहे.
ईडीने कंपनीच्या संचालकांसह मंत्र्यांच्या निवासस्थानी छापे देखील मारले होते. ईडीच्या कारवाईनंतर 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला देण्यात आलेले ग्रामविकास विभागाचे १५०० कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले होते. तसेच, कंत्राटी नोकर भरतीत पात्र ठरल्यानंतर सुद्धा या कंपनीला तत्कालीन सरकारने बाद केले होते.
नेमका हाच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी भाजपला सवाल केला आहे. राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करुन लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का, अशी विचारणा सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे.