मुंबई (Mumbai) : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) टोल वसुलीचे कंत्राट 'रोड वे सोल्यूशन' कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. ज्या तीन कंपन्यांनी या कंत्राटासाठी टेंडर भरले आहे, त्यात संबंधित कंपनीचे टेंडर सर्वात कमी किंमतीचे (एल वन) आहे. त्यामुळे 'रोड वे सोल्यूशन' चा टोल वसुलीचे कंत्राट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या टेंडरसाठी कल्याण टोल कंपनी, प्रकाश अस्फाल्टीग कंपनी आणि रोड वे सोल्यूशन या तीन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. समृद्धी महामार्गावर टोल कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टेंडर काढले आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील 26 टोल नाके उभारण्यात आले आहेत. या टोलवर वसूल करण्यात येणारे शुल्क थेट एमएसआरडीसीच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्यातून टेंडरप्रमाणे ठरवण्यात आलेल्या टक्केवारीप्रमाणे ठराविक रक्कम टोल वसूल करणार्या कंत्राटदारांना दिली जाणार आहे. टोल उभारणीपासून टोल, त्यावरील कर्मचाऱ्यांचे वेतन महामंडळ देणार आहे. या टेंडरसाठी कल्याण टोल कंपनी, प्रकाश अस्फाल्टीग कंपनी आणि रोड वे सोल्यूशन या तीन कंपन्यांपैकी रोड वे सोल्यूशन कंपनीचे दर सर्वाधिक कमी असल्याने या कंपनीला टोल वसुलीचे काम मिळणार आहे.
या टोल नाक्यावर मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान मोटार, जीप, कार, हलक्या लहान वाहनांना 1.73 रुपये प्रती किलोमीटर याप्रमाणे टोल भरावा लागणार आहे. त्याप्रमाणेच इतर हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने आणि मिनी बस या वाहनांना 2.79 रुपये प्रति किलोमीटर , बस अथवा ट्रक यांना 5.85 रुपये प्रति किलोमीटर, व्यावसायिक वाहनांना 6.38 रुपये प्रति किलोमीटर, अवजड बांधकाम यंत्रसामग्री वाहनांना 9.18 रुपये प्रति किलोमीटर तर अति अवजड वाहनांना 11.17 रुपये प्रति किलोमीटर टोल भरावा लागणार असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाने सांगितले.