नवी दिल्ली (New Delhi) : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (BPCL) खासगीकरणाबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. सध्याची भू-राजकीय परिस्थिती, तसेच हरित आणि अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने सुरू झालेल्या संक्रमणामुळे पूर्वाच्याच अटी-शर्तीवर खासगीकरण कठीण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचाच पुन्हा नव्याने विचार करणे गरजेचे असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. बीपीसीएलच्या खरेदीसाठी वेदांत समूहासह अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेअर कॅपिटल या दोन अमेरिकी कंपन्यांनी स्वारस्य दर्शवले आहे.
गेल्या वर्षी बीपीसीएलमधील सरकारची ५२.९८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेअर कॅपिटल या दोन अमेरिकी कंपन्यांनी प्रारंभिक बोली लावली होती.
कंपनीचे सध्याचे बाजार भांडवली मूल्य ८६ हजार २७१ कोटी रुपये असून सरकारचा संपूर्ण ५२.९८ टक्के हिस्सेदारी विकून ४५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये बीपीसीएलच्या विक्रीसाठी अर्ज मागविले होते.
केंद्र सरकारने बीपीसीएलच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेवर नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत लवकरच सुधारित टेंडर काढले जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे असे टेंडर जेव्हा निघेल तेव्हा त्याबाबत निर्णय घेऊ, असे वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले.