नवी दिल्ली (New Delhi) : मोठ्या अंतरावर असलेल्या शहरांना जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत (Vande Bharat) रेल्वे गाड्यांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्लिपर कोचेसचा वापर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी अत्याधुनिक सोईसुविधा असलेल्या 200 रेल्वे गाड्यांचे डिझाईन आणि निर्मितीसाठी रेल्वेने जागतिक टेंडर काढले आहे. हे टेंडर भरण्यासाठी 26 जुलै 2022 ही अखेरची तारीख आहे. 'वंदे भारत'च्या नव्या रेल्वे गाड्या पूर्णपणे वातानुकूलीत असणार आहेत, त्याचबरोबर मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या मार्गावर त्या चालविल्या जाणार आहेत.
वातानुकूलीत स्लिपर कोचेसचा समावेश असलेल्या नव्या रेल्वे गाड्यांचे डिझाईन, निर्मिती आणि सध्या वापरात असलेल्या रेल्वे गाड्यांचे अपग्रेडेशन आदींचा टेंडरमध्ये समावेश आहे. जुन्या रेल्वे गाड्यांचे अपग्रेडेशन लातूर आणि चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यांमध्ये करावे लागणार आहे. नव्या रेल्वे गाड्यांचा पुरवठा 82 महिन्यांमध्ये, म्हणजेच सहा वर्षे आणि 10 महिन्यांमध्ये करावयाचा आहे.
दिल्ली ते वाराणसी आणि दिल्ली ते कटरा या मार्गांवर वंदे भारत रेल्वे गाडी पहिल्यांदा धावली होती. या रेल्वे गाडीत देशात पहिल्यांदाच अनेक अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना पुरविण्यास सुरवात करण्यात आली.