पुणे (Pune) : पुणे-नाशिक हायस्पीड (Pune-Nahsik Highspeed Railway) रेल्वे प्रकल्पाला रेल्वेमंत्र्यांकडून अखेर हिरवा कंदील मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत सादर केलल्या प्रकल्प आराखड्याला तत्वत: मंजुरी देण्यात आली. पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडोरमुळे हा प्रकल्प बारगळणार अशी शक्यता व्यक्त केली जात असताना आज झालेल्या निर्णयामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. रेल्वे विभाग या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करेल. त्यासाठी एक पथक नेमण्यात येणार आहे. तांत्रिक तपासणी अहवालानंतर हा प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. तिथे त्याला मंजुरी मिळेल, अशा विश्वास फडणवीस यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला.
सर्व प्रक्रिया करून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडोरची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात गेले होते. रेल्वे मार्गाच्या कडेने ग्रीन कॉरिडोर करावा, या मार्गावर उड्डाण पूल उभारून रेल्वे आणि रस्ता असाही विचार पुढे आला होता. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. असे असताना दिल्लीत आज झालेल्या बैठकीत हायस्पीड रेल्वे प्रकल्प आराखड्यास रेल्वे मंत्राल्याने मान्यता दिल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
प्रकल्पाविषयी
- ही रेल्वे पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे.
- पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार
- प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च
- प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येणार
- उर्वरित ६० टक्के निधी हा कर्जरूपाने उभारण्यात येणार आहे.
पुणे व नाशिक ही मोठी शहरे आहेत. सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही शहरे आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. आजच्या बैठकीत तांत्रिक मुद्यांवर चर्चा करून या प्रकल्पाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- पुणे-नाशिक रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर लांबीचा
- रेल्वेचा प्रतितास वेग २०० किलोमीटर
- पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तासांवर येणार
- पुणे-नाशिकदरम्यान २४ स्थानकांची आखणी
- प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा