मुंबई (Mumbai) : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत (PWD) येणारे एक लाख पाच हजार किलोमीटरच्या रस्त्यांची सद्यस्थिती काय आहे, 31 हजार पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या इमारती पूल यांची परिस्थिती, रस्त्यांची किती कामे प्रगतीपथावर आहेत, किती कामे अपूर्ण आहेत, आदी सर्व माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.
सी-डॅक व एमआरएसएसी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि विभागाचे काम अधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टीम (PMIS) ही नवीन संगणक प्रणाली अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी मंत्री चव्हाण यांनी केले.
मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, मला सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी जेव्हा दिली तेव्हा या विभागामध्ये जी व्यवस्था होती ती पाहिल्यानंतर या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या खात्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदल्यांसाठी व पदोन्नतीसाठी कोणालाही आपल्याकडे हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही, हे मी विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्याच कार्यक्रमातील भाषणात बोललो होतो, असे सांगतानाच मंत्री चव्हाण म्हणाले की, मी जे बोललो त्याचप्रमाणे मी आतापर्यंत वागलो. आज माझ्याकडे पदोन्नती संदर्भात कोणताही विषय प्रलंबित नाही. विभागाचे अभियंता असो वा अधिकारी आम्ही सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणून आपल्या कार्यपद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे गरजेचे आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
'पीएमआयएस' व्यवस्थेला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित्या येणारे एक लाख पाच हजार किलोमीटर रस्ते, त्यांची असलेली सद्यस्थिती काय आहे, 31 हजार पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या इमारती, पूल आणि या सर्वांची आताची असणारी परिस्थिती, त्यामध्ये काही कमतरता आहे काय? रस्त्यांची किती कामे प्रगतीपथावर आहेत? किती कामे अपूर्ण आहेत, आदींची माहिती या नवीन संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहे.
आपल्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विभागातील रस्त्यांवर कुठेही खड्डा पडला असेल तर तो खड्डा दुरुस्त करणे हे आपल्या विभागाचे कर्तव्य आहे. तशी आपल्याकडे व्यवस्था तयार आहे आणि त्या व्यवस्थेमधून आपल्याला हे सर्व करायचे आहे, असे सांगतानाच चव्हाण म्हणाले की, एकदा पडलेला खड्ड्याला जर दुरुस्त केला नाही तर तो खड्डा हळूहळू वाढत जातो. त्यामुळे पुढील काळामध्ये रस्त्यामध्ये पडलेला खड्डा फार काळ राहणार नाही, टाईम बाउंड पिरियडमध्ये त्याची दुरुस्ती कशी होईल याकडे लक्ष देण्याची आणि यासाठी या विभागाने पूर्ण ताकदीने काम करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, मुंबई विभागाचे मुख्य अभियंता राजभोर आदी उपस्थित होते.