मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा (Mumbai-Goa) महामार्गावरील अवघड घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज या बोगद्याच्या कामाची पाहणी करुन प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात कशेडी घाटातील रस्त्यांचाही समावेश आहे. भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रूक असा हा महामार्ग आहे. या दोन्ही गावांच्या बाजूने पाच किलोमीटर अंतरावर दोन बोगदे तयार होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या या दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरु आहे. हे दोन्ही बोगदे तयार करण्यासाठी खास मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बोगद्यांसाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार आहे. कशेळी घाटातील वळणे अत्यंत धोकादायक आहेत. या घाटांमध्ये वारंवार अपघात होत असतात. नवीन बोगदे तयार झाल्यानंतर कशेळी घाटातील अपघात होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच या दोन्ही बोगद्यांमुळे कोकणवासियांचा प्रवास जलद होणार असून मुंबई आणि कोकण, गोव्याचे अंतर आणखी कमी होणार आहे.
या दोन्ही बोगद्यांमध्ये सहा मार्गिका आहेत. म्हणजे बोगद्यातील सहा रस्त्यांवरून वाहतूक होणार आहे. यावरून या बोगद्याची व्याप्ती दिसून येते. याशिवाय बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास आत 300 मीटरवर छेद मार्ग ठेवण्यात आला आहे. दोन्ही बोगद्यांची उंची 12 असून लांबी जवळपास 2 किलोमीटर आहे.
■ कशेडी घाट बोगदा
■ २ नवीन बोगदे बांधण्यात येत आहेत
■ एका बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे, डिसेंबर २०२२ पर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होइल, तर दुसरा बोगदा २०२३ मध्ये सुरु हॊणार आहे
■ सुमारे ९ किमीचा हा 4 लेन बोगदा आहे, यामुळे प्रवासाची सुमारे १ तासाची बचत होणार आहे