मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. महामार्गावरील खड्डे भरण्यात सध्याचे ठेकेदार अपयशी ठरल्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्याचे काम दुसऱ्या एजन्सीकडे देणार आहे. दुसऱ्या एजन्सीकडे खड्डे भरण्याचे काम देण्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे काम दुसऱ्या एजन्सीकडे सोपवण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. एकीकडे महामार्गाचे काम आणि दुसरीकडे रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे, यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत वारंवार आवाज उठवला जात आहे. मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या वेगाने खड्डे भरले पाहिजेत त्या वेगाने खड्डे भरले जात नाहीत. ही गोष्ट आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या एजन्सीला काम देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणेशोत्सवात प्रवाशांचा त्रास कमी व्हावा याकरिता महामार्गावरील खड्डे भरण्यावर भर दिला जाणार आहे.
गणेशोत्सवात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. अशावेळी महामार्गाच्या कडेला परावर्तक बसवणे गरजेचे आहे. हे परावर्तक बसवण्यासाठी एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महामार्गाच्या कामामुळे रस्ता वळवण्यात आला आहे. त्या रस्ता वळवण्याच्या कामासाठीही एक एजन्सी नेमण्यात येणार आहे.