पुणे (Pune) : सरत्या वर्षात प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी ‘पीएमपी’ने (PMPML) जे निर्णय घेतले, त्याची पूर्तताच झाली नाही. यात गुगलची (Google) सेवा सुरू करण्याची केवळ घोषणाच झाली. हीच स्थिती ‘आयटीएमएस’ची. नवीन बसची खरेदी, स्टेनलेस स्टीलचे थांबे, आगारांचा विकास, सिंहगडावर बससेवा सुरू करणे, बीआरटी (BRT) आदींबाबत पीएमपीचे नियोजन ढिसाळ राहिले. मात्र याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.
प्रवाशांना पीएमपीच्या बसचे लाइव्ह लोकेशन समजावे, प्रवासाचे नियोजन करता यावे म्हणून पीएमपी प्रशासनाने ‘गुगल’शी करार केला. अनेक बैठकाही झाल्या. या वर्षात कोणत्याही परिस्थितीत गुगलची सेवा सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले. पण वर्ष संपत आले तरीही गुगलची सेवा सुरू झाली नाही. प्रवासी अजूनही गुगल सेवेच्या शोधात आहेत.
‘आयटीएमएस’पासून प्रवासी दूर
आयटीएमएस (इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा काही वर्षांपूर्वी पीएमपीमध्ये सुरू होती. आतादेखील ती काही प्रमाणात सुरू आहे. मात्र ती पीएमपी प्रशासनापुरतीच मर्यादित आहे. याचा कोणताही फायदा प्रवाशांना होत नाही. या प्रणालीमुळे बसमधील प्रवाशांना पुढील थांबा कोणता, कोणत्या थांब्यावर बस उभी आहे, चालकाने कोणत्या थांब्यावर बस थांबवली नाही, बसचा वेग या बाबतची माहिती प्रवाशांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र ही सेवा सुरूच झाली नाही.
लाइव्ह लोकेशनबाबत निर्णयच नाही
गेल्या काही महिन्यांपासून गुगल व पीएमपी यांच्यात बसच्या लाइव्ह लोकेशनसंदर्भात बैठका झाल्या. पीएमपीच्या सुमारे नऊ हजार थांब्यांची व ठिकाणांची माहिती ‘गुगल’ला देण्यात आली. पीएमपीच्या मालकीच्या आणि ठेकेदारांच्या बस यांच्यातील यंत्रणा वेगळी आहे. ही सर्व यंत्रणा एकत्रित करण्याचे काम केले. पण त्यात यश आले नाही. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर पीएमपीच्या मालकीच्या ज्या बस आहेत, त्यात तरी लाइव्ह लोकेशन दाखविणारी यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत आहे. मात्र त्यावर पीएमपीने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.
नवीन बस कागदावरच
पीएमपीमध्ये जरी २०७८ बस असल्या तरीही प्रत्यक्षात १६५० बस रस्त्यांवर धावत आहेत. जून महिन्यांपासून ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. रोज सुमारे ६० बस बंद पडत होत्या. त्या वेळी बसच्या फिटनेसचा प्रश्न चर्चेला आला. बसचे आयुर्मान १० वर्षांहून १२ वर्षे करण्यात आले. मात्र तरीही बसची कमतरता जाणवत आहे. नवीन वर्षात ४९० बसेसचे आयुर्मान संपत असल्याने त्या प्रवासी सेवेतून बाद होणार आहेत. यंदा २०० नवीन बस खरेदी करण्याविषयी चर्चा झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत बसखरेदीचा निर्णय झाला. मात्र नवीन बस काही धावल्या नाहीत. सात मीटर लांबीचा विषय यंदाही मार्गी लागला नाही.
बसथांबेही नाहीत
बसथांब्यासाठी पीएमपीची चार वर्षांपासून सुरू असलेली भटकंती सरत्या वर्षात थांबली. बसथांब्यांसाठी सात वेळा टेंडर काढली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आठव्या टेंडरला प्रतिसाद मिळाला. जुलै महिन्यांपासून याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. स्टेनलेस स्टीलचे ३०० थांबे बांधण्याचा निर्णय झाला. मात्र, सहा महिने टेंडर प्रक्रियेतच गेले. प्रत्यक्षात एकही थांबा बांधला गेला नाही. प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात छत्र्या घेऊनच प्रवास करावा लागला.
डेपो विकासाच्या निव्वळ गप्पा
‘पीएमपी’ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएमपीने आपल्या डेपोंचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी १० डेपोंची निवड केली. मात्र प्रत्यक्षात डेपोंच्या जागेबाबत काहीच हालचाली झाल्या नाही. सरत्या वर्षात किमान टेंडर प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ते देखील झाले नाही. डेपोंचा विकास करून त्याचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. त्यातून पीएमपीला चांगले उत्पन्न मिळणार आहे. मात्र, ही कामे गतीने होणे अपेक्षित आहे. पीएमपी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तरच प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील.
‘सिंहगड’ला दाखविला कात्रजचा घाट
पर्यटकांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने सिंहगडावर बससेवा सुरू केली. २०२२ मध्ये ही सेवा सुरू झाली आणि अवघ्या १५ दिवसांतच ती बंद झाली. २०२३ मध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत विचार झाला. मात्र त्या वेळी लहान बस म्हणजेच सात मीटर आकाराची बस दाखल झाल्यावरच ही सेवा सुरू होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सरत्या वर्षात ना बस आली, ना सिंहगडावर बससेवा सुरू झाली.
बीआरटीचा उलटा प्रवास
वेगवान सेवेसाठी बीआरटीचा वापर होतो. स्वारगेट ते कात्रज सोडले तर अन्य ठिकाणी काही प्रमाणात ‘बीआरटी’ अस्तित्वात आहे. लाखो रुपये खर्चून पुणे व पिंपरी-चिंचवड भागात बीआरटी बांधली. आता हीच बीआरटी कधी वाहतुकीला अडथळा ठरते, तर कधी अपघातप्रवण क्षेत्र ठरत असल्याचा ठपका ठेवून बीआरटी हटविली जाते. सरत्या वर्षात बीआरटीचा विस्तार झाला नाही, मात्र नगर रस्त्यावरील सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेली बीआरटी हटविण्यात आली. यासाठी महापालिका प्रशासनाने विविध ठिकाणच्या तुटलेल्या बीआरटीमुळे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाल्याचे सांगितले.
नवीन वर्षात काय करणार?
- बसची संख्या वाढविणार
- मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना तिकीट काढण्याची सुविधा
- डबलडेकर बसची सेवा सुरू करणे
- नवीन ई-बसची खरेदी
पीएमपी दृष्टिक्षेपात
२०७९ - एकूण बस
१६५० - प्रवासी सेवेत
१२ लाख - प्रवासीसंख्या
१ कोटी ७२ लाख - प्रवासी उत्पन्न
३९२ - एकूण मार्ग
३.६० लाख किलोमीटर - रोजचा प्रवास