पुणे (Pune) : तुमच्या जमिनी अथवा मिळकतींसंदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात एखादा दावा दाखल आहे, त्या दाव्याची सद्यःस्थिती काय आहे. अथवा तुम्हाला एखादी जमिनी विकत घ्यावयाची आहे, त्यावर कोणता दावा दाखल आहे की नाही, यांची माहिती हवी असेल, तर आता महसूल कार्यालयात अथवा भूमी अभिलेख विभागाकडे जावे लागणार नाही. कारण ही माहिती आता घरबसल्या मिळणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जमिनीचा सर्व्हे नंबर, तालुका, जिल्हा आदी माहिती टाकल्यानंतर त्या जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही, याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे. या सुविधेमुळे जमिनीची खरेदी करताना होणाऱ्या फसवणूकीला आळा बसणार आहे.
जमिनी वाटप आणि खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर वादविवाद वाढत आहेत. अनेकदा अशा जमिनीची खरेदी करतेवेळी त्या जमिनीसंदर्भात काही न्यायालयीन वाद आहे का, यांची माहिती लपविली जाते अथवा माहिती मिळत नाही. जमिनीची खरेदी-विक्री करताना वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेतला जातो. परंतु, अनेकदा त्यामध्ये जमिनीवरील न्यायालयीन वाद सुरू असल्याचे दिसून येत नाही. तसेच, सातबारा उतारा अथवा फेरफार उताऱ्यावर न्यायालयीन वाद सुरू असल्याचे कुठेही नोंद नसते. त्यातून खरेदीदारांची फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने महसूल व दिवाणी न्यायालयातील जमीन विषयक दावे सर्व्हे नंबरनिहाय लिंक करण्याची योजना आखली आहे. याबाबतची संगणक प्रणाली तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ही सेवा भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.
येथील दाव्यांची माहिती मिळणार
महसूल विभागातील मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अपर विभागीय आयुक्त, महसूलमंत्री, महसूल न्याय प्राधिकरण यांच्याकडे सुरू असलेल्या जमिनींच्या दाव्यांची माहिती मिळणार आहे, तर दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये जमीन विषयक दाखल असलेल्या दाव्यांची मिळणार आहे.
...अशी मिळणार माहिती
महसूल विभागात संबंधित अधिकाऱ्यांकडे दावा दाखल केल्यानंतर तेथील लिपिक या दाव्यांची माहिती ईक्यूजेसी या संकेतस्थळावर जाऊन भरणार आहे. यामध्ये गाव, तालुका, जमिनीचा सर्व्हे नंबर अथवा गट नंबर दावा आदी माहिती भरणार आहे. ही माहिती भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाशी लिंक केली जाणार आहे. एखाद्या व्यक्तीने भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन जमिनीचा सर्व्हे नंबर टाकल्यास तो सातबारा उतारा दिसणार आहे. त्याचबरोबर त्या जमिनीसंदर्भात कोणत्या न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, हे समजणार आहे. दावा दाखल असेल तर कोणत्या न्यायालयात आहे, कधीपासून सुनावणी सुरू आहे, ही माहिती मिळणार आहे.
या संकेतस्थळाला भेट द्या...
https//Mahabhumi.gov.in
सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्डसंदर्भात महसूल अथवा दिवाणी न्यायालयात काही दावे प्रलंबित असतील, तर त्यांची माहिती घरबसल्या मिळावी, यासाठी भूमि अभिलेख विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाभूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर ही सर्व्हिस आहे.
- निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त