पुणे (Pune) : पुणे महापालिकेतर्फे (PMC) सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे (Flyover On Sinhgad Road) काम सुरू केले असून, बहुतांश पिलरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता या उड्डाणपुलाच्या कामासोबतच खडकवासला ते हडपसर या मेट्रो मार्गासाठीचे (Khadakwasla To Hadapsar Metro Line) ३१ पिलर महापालिका उभारणार आहे. त्यासाठी येणारा ११ कोटी रुपयांचा खर्च मेट्रोकडून वर्ग करून घेतला जाईल.
या कामामुळे भविष्यात मेट्रोचे काम करताना उड्डाणपुलावर फोडाफोडी करावी लागणार नाही. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यंत सुमारे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
ब्रह्मा हॉटेल ते संतोष हॉल चौक या दरम्यान पिलचे काम पूर्ण झाले असून, त्यावर आता गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. तर ब्रह्मा हॉटेल ते गोयलगंगा चौकापर्यंत पिलरचे काम पूर्ण झाले आहे. संतोष हॉल ते राजाराम पूल दरम्यान पिलर उभारणीचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
खडकवासला ते हडपसर या मेट्रो मार्गाचे काम करताना उड्डाणपुलाचा मेट्रोच्या पिलरला अडथळा होऊ नये यासाठी अलाइनमेंट तपासण्यात आलेली आहे. त्यामध्ये मेट्राला पिलर उभारता येईल, अशी व्यवस्था केल्याचे यापूर्वीच महापालिकेने स्पष्ट केले आहे. फनटाईम ते राजाराम पूल या दरम्यान मेट्रोचे एकूण १०६ पिलर असतील. यातील काही पिलर हे रस्त्याच्या मध्यभागी तर काही पिलर हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार आहेत.
यामुळे एकत्र पिलरची उभारणी
राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल असणार आहे. या दोन्ही बाजूने जेथे उड्डाणपूल संपतो व त्यांचा रॅम्प सुरू होतो, त्याच ठिकाणी मेट्रो स्थानकांचे नियोजन आहे. तेथे मेट्रोचे काम करताना उड्डाणपुलाचा रॅम्प फोडावा लागेल, त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होणार आहे.
ही अडचण महापालिका व मेट्रोला लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोन्ही ठिकाणचे ३१ पिलर उड्डाणपुलाच्या कामासह करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पास अद्याप मान्यता मिळाली नसली तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या कामासाठी ११ कोटी रुपये खर्च येणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल बांधताना त्याच वेळी मेट्रोसाठीचे ३१ पिलर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यातील नुकसान टळणार आहे. या कामासाठी ११ कोटी रुपयांचा खर्च असून, आता महापालिका तो खर्च करेल, त्यानंतर ही रक्कम वळती केली जाईल
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
रस्त्याच्या दुरावस्थेचे काय?
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम करताना माणिकबागेत दोन्ही बाजूचा रस्ता खराब झाला आहे. खड्डे व अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच स्वारगेटच्या दिशेने जाताना एका इमारतीपुढे लावलेले लोखंडी अडथळे काढले नसल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे, हे रॉड काढून टाकावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख महेश पोकळे यांनी केली आहे.