मुंबई (Mumbai) : जमिनींचे संपादन, निधीची कमतरता आदी कारणांमुळे नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग मागील २६ वर्षांपासून रखडला आहे. आता मात्र या मार्गावरील खारकोपर ते उरण ही सेवा २०२३ मध्ये सुरू करण्याचा निर्णय सिडको आणि रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी रात्रंदिवस मजूर काम करीत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडून लक्ष घातले जात आहे.
खारकोपर ते उरण मार्गावरील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा (नवघर), द्रोणागिरी (बोकडविरा) आणि उरणच्या रेल्वे स्थानकांच्या कामाला वेग आला आहे. उरण रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंत तसेच स्थानकातील इतर सुविधाची ही कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्लॅटफॉर्म तयार झाले असून स्थानकाच्या छताचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. छतासाठी लोखंडी बीम टाकण्याचे काम करण्यात येत आहे. यासाठी मोठं मोठ्या क्रेन्सच्या सह्यायने हे बीम बसविण्यात येत आहेत. हे स्थानकाच्या छताच्या कामासाठी रात्रंदिवस मजूर काम करीत आहेत. उरण मधील सिडकोच्या विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोड जवळ ही स्थानके असून या नागरी परिसरात मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा येथील नागरिकांना लागली आहे. हा रेल्वे मार्ग १९९७ मध्ये मंजूर झाला आहे. मात्र, जमिनींचे संपादन, निधीची कमतरता आदी कारणांमुळे नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग मागील २६ वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे उरणच्या विकासालाही खीळ बसली होती. मात्र सिडको आणि शासनाला उलवे नोड नंतर उरणच्या द्रोणागिरी नोडच्या विकासासाठी सुरुवात करायची आहे. त्यामुळेच या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडून लक्ष घातले जात आहे. त्यामुळे जासई येथील रखडलेले रेल्वे पुलाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू केले आहे.
या मार्गावरील नवघर येथील स्थानकाला न्हावा शेवा हे नाव देण्यात आले आहे. या नावाला येथील ग्रामस्थांचा विरोध आहे. हे नाव बदलून न्हावा शेवा ऐवजी नवघर नाव देण्याच्या मागणीसाठी १५ नोव्हेंबर ला सिडकोच्या कार्यालया समोर नवघर येथील सामाजिक कार्यकर्ते एल.बी. पाटील यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे द्रोणागिरी स्थानक हे बोकडविरा गावा जवळ असल्याने द्रोणागिरी ऐवजी बोकडविरा स्थानक नाव देण्याची मागणी बोकडविरा ग्रामस्थांनी रेल्वे आणि सिडकोकडे केली आहे.