नवी दिल्ली (New Delhi) : सुमारे अठरा हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित मनमाड-इंदूर या ३०९ कि.मी. लांबीच्या रेल्वे प्रकल्पामुळे उत्तर भारतातील आग्र्यापासून जेएनपीटी बंदरापर्यंतचा कॉरिडॉर प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. या रेल्वेमार्गामुळे नाशिक आणि धुळे जिल्हे तसेच आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्षे, भरड धान्यांसह विविध कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेले मोठ्या प्रमाणावरील कृषिक्षेत्र एकीकडे जेएनपीटी बंदर तर दुसरीकडे उत्तर भारताशी जोडले जाणार आहे.
महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि गिरीश्वेर या तीन ज्योतिर्लिंगांना हा प्रकल्प जोडणार आहे. या रेल्वेमार्गाची महाराष्ट्रातील लांबी १३९ किमी असून, त्यात १६ स्थानके आणि ३.५ किमी लांबीचे बोगदे, १२ उड्डाणपूल, ७९ भुयारी मार्ग, तसेच नर्मदा आणि तापी नद्यांवरील सात मोठे दुहेरी रेल्वेमार्गांचे पूल असतील.
ताशी १६० किमी वेगाने गाड्या धावण्यासाठी या प्रकल्पाला सेमी हायस्पीड कॉरिडॉरच्या दृष्टीने विकसित करण्यात आले आहे. ३०९ किमी लांबीचा हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी पाच वर्षे लागतील, असे वैष्णव यांनी सांगितले.
नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाच्या डीपीआरचे काम सुरू
नाशिकला वाढवण बंदराशी जोडण्यासाठी नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. आग्र्यापासून वाढवण बंदरापर्यंत मोठा व्यावसायिक कॉरिडॉर प्रस्थापित करण्यात नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाचा मोठा वाटा असेल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.