मुंबई (Mumbai) : कचरा व्यवस्थापन कंपनी 'अँटनी वेस्ट हँडलिंग'ला गेल्या आठवड्यात एक मोठे टेंडर मिळाले आहे. एक्सचेंज फाईलिंगनुसार कचरा व्यवस्थापन कंपनीला नवी मुंबई महापालिकेकडून 908 कोटी रुपयांचे टेंडर मिळाले आहे.
'अँटनी वेस्ट हँडलिंग'ची उपकंपनी 'मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट'ला हे टेंडर मिळाले आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेच्या घनकचरा संकलन आणि वाहतूक आणि त्याच्या कामाशी संबंधित आहे. हे टेंडर 9 वर्षांसाठी आहे.
महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाचे ठेकेदाराला काम दिले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्याने महापालिकेने याच ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ दिली ती २०२४ मार्चपर्यंत वाढवली. नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'मे. ए. जी. एनव्हायरो' या ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती. महापालिकेने एप्रिल महिन्यात टेंडर प्रसिद्ध केले होते.
कचरा वाहतूक व संकलनासाठीचा विस्तृत असा प्रकल्प अहवाल महापालिकेला प्राप्त झाल्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने बनवण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली.
नव्या टेंडर प्रक्रियेत कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाणार आहे. तसेच सध्या सर्वत्र इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर सुरू झाला असताना कचरा वाहतुकीसाठीही छोट्या इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्याचाही विचार आहे.