मुंबई (Mumbai) : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मागील वर्षी १७ नोव्हेंबरला सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोला (Navi Mumbai Metro) रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. प्रवासी भाड्यातून सिडकोला वर्षभरात १२ कोटींहून अधिक उत्पन्न प्राप्त मिळाले आहे. तर दैनंदिन तब्बल २० हजार प्रवासी नवी मुंबई मेट्रोने प्रवास करीत आहेत.
खारघर तसेच तळोजा परिसरातील नागरिकांना बेलापूर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी एनएमएमटी बस अथवा रिक्षावर अवलंबून राहावे लागत असे. बस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे भरमसाठ भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत होता. गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १७ नोव्हेंबरला नवी मुंबई मेट्रो सुरू झाली. नवी मुंबई मेट्रो सुरू होऊन काल एक वर्ष पूर्ण झाले.
सुरुवातीला मेट्रोचे तिकीटदर जास्त असले तरी काही प्रमाणात वाहतूक समस्या दूर झाली आहे. सुरवातीला दैनंदिन बारा ते चौदा हजार प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, नवी मुंबई मेट्रोचा दर मुंबई मेट्रोपेक्षा अधिक असल्यामुळे प्रवासी संख्या जैसे थे होती.
तिकीटदर कमी व्हावा, यासाठी प्रवासी तसेच राजकीय पक्षांनी सिडकोकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर सिडकोने ७ सप्टेंबरपासून ३३ टक्के तिकीटदर कमी करून किमान दर १० व कमाल ३० रुपये लागू केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे प्रवासीसंख्येत वाढ झाली असून दैनंदिन २० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. गेल्या वर्षभरात प्रवासी भाड्यातून १२ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाल्याचे सिडकोतील सूत्रांनी सांगितले.