पिंपरी (Pimpri) : पुणे-नाशिक (Pune-Nashik) महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर या २८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर संपूर्ण उड्डाणपूल केंद्र सरकारच्या पुढाकाराने करण्याचे नियोजन आहे. सहा लेनचा दुमजली उड्डाणपूल करून एकूण १२ लेनचा महामार्ग करण्याची सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली आहे, असे पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडसह चाकण परिसरातील वाढत्या औद्योगीकरणामुळे वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. सध्या राजगुरुनगर ते नाशिक फाटा अंतर पार करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास एवढा वेळ लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर या रस्त्याचे रुंदीकरण दोन टप्प्यात होणार होते. पहिला टप्पा नाशिक फाटा ते मोशी टोल नाका आणि दुसरा टप्पा मोशी टोल नाका ते चांडोली टोल नाका. दरम्यान, मोशी टोल नाका ते चांडोली टोल नाका या सहा पदरी रस्त्याला मान्यता मिळाल्याने त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.
डीपीआरनुसार अनेक ठिकाणी भुयारी मार्ग आणि मोशीत तीन किलोमीटर व चाकणमध्ये सव्वादोन किलोमीटर लांब उड्डाणपूल नियोजित होते. यामुळे वाहतूक संथ गतीने झाली असती, ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा २८ किलोमीटरचा मार्ग सहा लेनचा दुमजली उड्डाणपूल करून १२ लेनचा करण्यासाठीच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत दिल्या असल्याचे मेदगे यांनी कळविल्याचे लांडगे यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात उड्डाणपूल
फायदा : नाशिक, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर येथील प्रवाशांना अत्यंत सहजपणे पुण्यात नाशिक फाट्यापर्यंत पोहोचता येणार
अडचणी : पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव
अपेक्षा : उड्डाणपूल व रुंदीकरणासाठी भूसंपादन आणि बाधित जागामालकांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही होणे अपेक्षीत