नागपूर (Nagpur) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बहुप्रतिक्षित कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारणीच्या मार्गातील काटे आता दूर झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिपूजनाचा नारळ फोडल्यानतंरही वृक्ष कापण्याची परवानी मिळाली नव्हती. यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीतील अडसर दूर झाला नव्हता. मात्र आठवडाभरापूर्वी या संस्थेच्या उभारणीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) उद्यान विभागाने 191 वृक्ष कापण्याची परवानगी मिळाली आहे.
विदर्भातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मेडिकलमध्ये 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरातील मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा केली. 12 वर्षे लोटून गेली, मात्र राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे वेगवेगळ्या खेळीतून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मेडिकलमधील कॅन्सरचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केल्यामुळे सरकाला कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारणे बंधनकारक झाले.
अखेर विद्यमान सरकारने कॅन्सर इन्स्टिट्यूसह एकूण 514 कोटींच्या कामाचे भूमिपूजन केले. कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या या जागेवर 191 झाडे आहेत. या झाडाच्या कापणीसाठी मेडिकल प्रशासनाने महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला पत्र दिले. पाच वर्षे लोटून गेली, मात्र परवानगी मिळाली नव्हती. अलीकडे परवानगी मिळाली. 22 हजार 570 चौरस मीटरची जागेवर बांधकाम होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.