एकता ठाकूर - गहेरवार
Nagpur News नागपूर : नागपूरचे भूषण असलेल्या अंबाझरी तलावाने (Ambazari Lake) धोक्याची घंटा वाजविली आहे. 23 सप्टेंबर 2023 मध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. तर यात कोट्यवधीच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.
आता येणाऱ्या दिवसांत जर काळजी नाही घेतली तर अर्धे नागपूर जलमय होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्या लोकांचे यात नुकसान झाले आहे, अशा लोकांना आर्थिक मदत सुद्धा घोषित करण्यात आली होती, मात्र अद्यापही कित्येक जण या मदतीपासून वंचित आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने नुकसानग्रस्त परिसरात सुशोभिकरणासाठी कोट्यवधींचे पॅकेज दिले आहे.
23 सप्टेंबर 2023 ला आलेल्या महापुरामुळे रामगोपाल बाचुका व इतर पीडित नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, अंबाझरी तलाव किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात यावा, महामेट्रोच्या सेव्हन वंडर्स ऑफ वर्ल्ड प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्यात यावे इत्यादी मागण्या केल्या आहेत.
स्वामी विवेकानंद स्मारक अनधिकृत :
8 मार्च 2018 च्या जीआरनुसार अंबाझरी तलाव परिसरात बांधलेले स्वामी विवेकानंद स्मारक हे अनधिकृत आहे. हे स्मारक हटविण्याबाबत 10 जूनपर्यंत निर्णय घेत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला दिले. तसेच, या स्मारकासाठी पर्यायी जागा निश्चित करा, असेही आदेशामध्ये नमूद केले. तत्पूर्वी, बदलत्या भूमिकेवरून न्यायालयाने महानगरपालिकेला कडक शब्दांमध्ये फटकार सुद्धा लावली. या स्मारकाचे बांधकाम 2017 मध्ये पूर्ण झाले असून त्यावर 1 कोटी 42 लाख 11 हजार 756 रुपये खर्च आला आहे.
स्मारक न तोडता पाण्याचा अडथळा होणार दूर :
जल अभ्यासक प्रवीण महाजन यांच्या म्हणण्यानुसार, जरी स्वामी विवेकानंद स्मारकाचे बांधकाम अनधिकृत असले तरी नागपुरकरांची भावना लक्षात घेता स्मारक न तोडता पाण्याचा अडथळा दूर करता येवू शकतो. स्वामी विवेकानंद स्मारकाच्या दोन्ही बाजूला 5-5 मीटरच्या भिंती आहेत. फ्लड मॅनेजमेंटच्या सूत्रानुसार पाणी जाण्यासाठी कमीतकमी 12 मीटर जागा पाहिजे. सध्या स्थितित स्मारकाच्या दोन्ही बाजुच्या 5-5 मीटरच्या भिंती तोडल्या गेल्या तर पाणी जाण्यासाठी मोकळी जागा मिळेल. डाव्या बाजूला 6 मीटर आणि उजव्या बाजूला 8 मीटर जागा वाढवू शकतो आणि स्मारकाच्या खाली एक खोली आहे ती सुद्धा तोडल्या गेली तर स्मारकाच्या खालून सुद्धा पाणी जाईल. सोबतच स्मारकाला बिम लाऊन सपोर्ट सुद्धा देता येतो.
नाग नदीवरील अतिक्रमण हटवीने गरजेचे :
शहराचा जीवघेण्या पुरापासून बचाव करण्यासाठी नाग नदीचा जलशास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे. परंतु अद्याप ही अभ्यास केला नसल्यामुळेही न्यायालयाने महानगरपालिकेवर ताशेरे ओढले. न्यायालय गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकरण हाताळत आहे. वेळोवेळी आवश्यक निर्देशही देण्यात आले आहेत. असे असताना मनपा केवळ वेळ मारून नेण्याच्या धोरणानुसार चालत आहे, असे न्यायालय म्हणाले.
तसेच, पुन्हा पूर येऊ नये यासाठी आगामी पावसाळ्यापूर्वी तातडीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. क्रेझी कॅसल परिसरातील नाग नदी कमीत कमी 25 मीटर रुंद केली गेली पाहिजे. कारण जो पर्यंत नाग नदीवरील अतिक्रमणे हटविल्या जात नाही तो पर्यंत नदी मोठी केली जाणार नाही.
तत्कालीन नागपूर मनपा आयुक्त चंद्रशेखर आणि तत्कालीन न्यायाधीश जे. एम. पटेल यांनी काही वर्षांपूर्वी अतिक्रमण हटाओ मोहिम हाती घेतली होती. त्यांच्यासारखेच काम आज करण्याची गरज असल्याचे जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी सांगितले. जर अतिक्रमण हटविले नाही तर नागपूर शहराला पूर स्थितितून कोणी वाचवू शकणार नाही, असा त्यांचा दावा आहे.
यावर दिले पाहिजे लक्ष...
200 हेक्टर बुडीत क्षेत्र असलेल्या या तलावाला लघु प्रकल्प म्हणता येईल. या धरणाची लांबी जवळपास 930 मीटर येईल तर स्पीलवे हा 140 मीटरचा आहे. या तलावाची उंची ही 19 मिटर आहे. तलाव पूर्ण भरल्यास पाणी पातळी ही 37 फूट असेल. हा तलाव वर्षातील 10 महिने लबालब भरलेला असतो. यात 8 दलघमी पाणी साठवण होते. 14 किमी केचमेन्ट असलेला हा तलाव पुढे ओव्हरफ्लो झाल्यावर नाग नदीव्दारे शहराच्या अनेक भागातून 23 किमी असलेल्या पारडी पर्यंत जातो.
पुढे तो कन्हान नदीला मिळतो. या 23 किमी अंतरात अनेक ठिकाणी ही नाग नदी अरुंद तर झालेली आहेच, पण नाल्या सदृश्य नाग नदीवर अतिक्रमणाने उच्चांक गाठला आहे. यशंवत नगर, कॉरपोरेशन क्वालनी, डागा ले आऊट, शंकरनगर, रामदासपेठ, धंतोली व आजू बाजूचे काही परीसर हे रेड झोन ठरू शकतात.
अंबाझरी तलावांच्या मजबूतीकरणात सध्या धरणाची जी माथा पातळी आहे त्यापेक्षा रुंदीकरणासह मजबूतीकरण करणे आवश्यक आहे. धरणाला पिचिंग करून त्यांचेही मजबूतीकरण करावे लागेल. माती धरणाची पाळ संपूर्ण मजबूत केल्यास भविष्यातल्या येणा-या अडचणी सोडविल्या जाईल.
सुरक्षा भिंत नसती तर...
2020-21 मध्ये अंबाझरी तलावाच्या सभोवताली सुरक्षा भिंत बांधली गेली आहे. परंतु पहिले अंबाझरी तलावाची स्थिती फार वाईट होती. अनेक जागीवरून पाणी हे वाहत होते. 23 सप्टेंबर 2023 ला अंबाझरी तलावाला अतिवृष्टीमुळे पूर आला होता. या सुरक्षा भिंतीमुळे पाणी अडवले गेले होते. जर ही सुरक्षा भिंत नसती तर 23 सप्टेंबर 2023 रोडीच अर्धे नागपूर शहर पाण्याखाली गेले असते.