नागपूर (Nagpur) : हर रंग कुछ कहता है...अशी एका पेंट कंपनीची जाहिरात होती. त्यातील पिवळा रंग काय संदेश देतो हे फारसे कोणाला ठावूक नाही. मात्र, महामेट्रोने (MahaMetro) खांब रंगवण्यासाठी पिवळ्या रंगाची निवड करून त्यावर ५० कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. त्याकरिता टेंडर काढण्याची किंवा शासकीय नियमावलीचे पालन करण्याची गरज मेट्रोला वाटली नाही. यावर आक्षेप घेण्यात आला असल्याने आता हा रंग आता मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलाच सतावत आहे.
नागपूर शहरातील सर्वसामान्यांसाठी मेट्रो रेल्वे हा कौतुकाचा विषय आहे. दुमजली, चारमजली उड्डाणपूल, व्हर्टिकल गार्डन, आकर्षक रेल्वे स्थानके बघून सर्वांचेच डोळे दिपून जातात. आपण नागपूरमध्येच आहोत यावर कही क्षण विश्वास बसत नाही. मात्र मेट्रोची सफर करताना पदोपदी नागपूरच्या झपाट्याने बदललेल्या लूककडे सर्वांचे लक्ष वधले जाते. दुसरीकडे हे बदल अनेकांना खटकत आहेत. त्यापेक्षा यावर सुरू असलेल्या उधळपट्टी आणि प्रत्यक्ष येणारा खर्चाची बाब ज्याला कळते त्यांचे तर डोळेच विस्फारले आहेत.
महामेट्रोने ‘वायडक्ट' बांधकामाचा करार ॲफकॉन कंपनीसोबत केला आहे. ४७६.९० कोटींचा एकूण करार आहे. त्यात खांबाच्या पेंटींगचा समावेश नव्हता. मात्र, याच कराराचा आधार घेऊन खांबांच्या पेंटींचेही काम याच कंपनीला देण्यात आले. त्यानुसार शेकडो खांबांना पिवळा रंग फासण्यात आला आहे. ४८ रुपये चौरस फूट या दराने खांबांच्या पेंटींगचे काम देण्यात आले आहे. अशा पद्धतीने ५० कोटी रुपयांचे काम विनाटेंडर देण्यात आले आहे. बाजारात पेंटींगचा दर २० रुपये चौरस फूट इतका आहे. त्यात साहित्याची किंमत अंतर्भूत आहे. त्यामुळे तब्बल २८ रुपये चौरस फूट महामेट्रो जादाचे मोजण्यात येत आहे. या खर्चावर काही बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवला होता. आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. मात्र महामेट्रोच्या प्रशासनाच्यावतीने अद्याप कुठलेही उत्तर त्यांना दिलेले नाही.
महामेट्रोच्या प्रशासनाचे काम अतिशय गुप्तपणे होत आहे. त्याची माहिती देण्याचे व शासकीय नियमावलींचे पालन करण्याचे सौजन्यसुद्धा दाखवले जात नाही. ही बाब अनेकांना खटकत आहे. महामेट्रोचे प्रशासन स्वच्छ व पारदर्शी असल्याचा दावा करते तर माहिती का लपवली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांचे बड्या नेत्यांसोबत असलेले लागेबांधे असल्याने मेट्रो रेल्वेचा अनागोंदी कारभार सुसाटपणे सुरु असल्याचे बोलले जाते. आक्षेपासंदर्भात विचारणा केली असता मेट्रोचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.