नागपूर (Nagpur) : जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) माध्यमातून उपराजधानीचा नागपूर जिल्ह्याला (Nagpur Dist.) यंदा भरघोस निधी मिळाला आहे. या आर्थिक वर्षाच्या (2022-23) तुलनेत पुढील आर्थिक वर्षाच्या (2023-24) निधीत तब्बल 95 कोटींची वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शहरी भागाच्या विकासासाठी 79 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
वर्ष 2023- 24 साठी डीपीसीच्या माध्यमातून 998 कोटींची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी जिल्ह्यासाठी 800 कोटींचा निधी मंजूर केला. यात डीपीसीला 720.50 कोटींचा निधी मंजूर झाला. तर शहरी भागाच्या विकासासाठी 79 कोटींचा निधी देण्यात आला.
वर्ष 2022-23 साठी तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांनी 625 कोटींचा निधी डीपासीला तर शहरी भागासाठी 53 कोटींचा निधी दिला होता. प्रथमच शहरी भागाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी डीपीसीला देण्यात आला होता.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार
डीपीसीच्या निधीवर अप्रत्यक्षपणे स्थगिती आहे. निधी वितरणात विद्यमान पालकमंत्र्यांकडून बदल करण्यात येणार आहे. लघु गटाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. परंतु अंतिम शिक्कमोर्तब बाकी आहे. पुनर्नियोजनाच्या बैठकीत शिक्कमोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. मार्चच्या पहिल्या आवठड्यात ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.