मुंबई (Mumbai) : राज्यातील कंत्राटदारांची (Contractors) प्रलंबित बिले (देयके) मिळाली नसल्याने संघटना आक्रमक झाली आहे.
त्यामुळेच राज्यातील सर्व कंत्राटदारांनी दिवाळी सणानिमित्त मुख्यमंत्री (CM Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री (DCM Devendra Fadnavis and Ajit Pawar), राज्यपाल यांना काळी पणती व काळा आकाश कंदील पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तीन लाख कंत्राटदार यांनी महत्त्वाच्या पाच मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने संपूर्ण राज्यात ३१ सप्टेंबर पासून शासनाची विकासाची कामे बंद करण्याचे आंदोलनही सुरू केले आहे. तसेच ८ ऑक्टोबर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांत धरणे आंदोलन करून निवेदनही दिले.
तरीही त्याची दखल घेतली नसल्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, कार्याध्यक्ष संजय मैंद आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.