मुंबई (Mumbai) : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधला जात आहे. यातील एका बोगद्याचे 9 पैकी 4 किलोमीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किमी ने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पॅकेज १ व पॅकेज २चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ६७०० कोटी इतकी आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हे काम सुरु आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागात घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.
या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किमीच्या राहिलेल्या मिसींग लिंकमुळे मुंबईला लवकर पोहचणे शक्य होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरीडॉर सुधारणा तथा देखभाल , दुरुस्तीसाठी "बांधा, वापरा व हस्तांतरीत करा' (बिओटी) या तत्वावर 30 वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरीत केले आहेत. महामार्गामुळे पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे जवळ आली आहेत. दोन्ही शहरातील अंतर हे तीन ते साडेतीन तासावर आले आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे.
कसा आहे हा प्रकल्प ?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिकेच्या (मिसिग लिंक) प्रकल्पांतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळा (सिंहगड संस्था) पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे. खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि.मी. राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधणे.
प्रकल्पाची गरज काय ?
आडोशी बोगद्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (६ लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (४ लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण होणार आहे.
खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि.मी.च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे १.६८ कि.मी. व ८.८७ कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे ०.९०० कि.मी. व ०.६५० कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होऊन १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पास ४ जून २०१९ रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पास २४ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत पॅकेज २ करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना १ मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
पॅकेज १ व पॅकेज २चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.
या प्रकल्पाची एकूण किंमत ६६९५.३७ कोटी इतकी आहे.