Mumbai Nashik Highway News मुंबई : मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात माजिवडा ते वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने (MSRDC) या रस्त्याचे काम २०२१ पासून हाती घेतले. सुमारे बाराशे कोटी खर्चाचा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांची वाहतूकही या मार्गावरून होत असते. हा महामार्ग असूनही अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित येतो.
प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. येथील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यावरून टीका होऊ लागल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने माजिवडा ते वडपे या रस्त्याचे काम २०२१ मध्ये हाती घेतले.
याच मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच येथील साकेत, खारेगाव या खाडी पुलांच्या प्रकल्पाची महत्त्वाची कामे केली जात आहेत. तसेच भिवंडी येथील एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपुलाच्या कामांचाही यात समावेश आहे.
महामार्गावरील महत्त्वाच्या पुलांपैकी खारेगाव पुलाचे ६२ टक्के, साकेत पुलाचे ६९ टक्के, रेल्वेपुलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपुलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचे केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पात चार पदरी मुख्य मार्गिकांचे आठ पदरी मार्गामध्ये रुपांतर तसेच प्रत्येकी दोन-दोन पदरी सेवा रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे.
येत्या तीन महिन्यांत उर्वरित ४० टक्के पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पाला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. ठाणे शहर, घोडबंदर भागात पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका निर्माणाची कामे यामुळे अवजड वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतूक बदल आदी विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले.