मुंबई (Mumbai) : मुंबईतल्या घराघरांत उंदरांची घुसखोरी झाल्याचे महापालिकेच्या नजरेत आले अन् या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने तब्बल कोटी रुपये खर्च केला. बरं आता हे उंदीर कोठे, कधी आणि किती सापडली आणि त्यांना मारले का, मारून ते कोठे टाकले याचे उत्तर महापालिकेला सापडलेले नाही असे दिसून येत आहे. तरीही महापालिका म्हणते, जागोजागी उंदीर होते आणि म्हणून हा एवढा पैसा गेला. त्यामुळे उंदीर मारण्यावरूनही महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पैसा खाल्ल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. परिणामी, बारा महिने घोटाळ्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या मुंबई महापालिकेत आता उंदीर प्रकरणाचा शिरकाव होऊन नवा वाद पेटल्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील निवासी आणि व्यावसायिक संकुलात उंदीर होऊ नाहीत, यासाठी उपाययोजना केल्या जातात. तरीही ज्या भागात उंदीर होतात त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पिंजऱ्यांची व्यवस्था करून त्यांना पकडले जाते. या कामासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात येते. यासाठी टेंडर काढून ठेकेदार नेमला जातो. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात शहरात फारसे उंदीर नसल्याचे सांगण्यात येत होते.
ऐन कोरानाच्या काळात मात्र लोकवस्त्यांमध्ये उंदीर झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या. त्यानंतर तेवढीच तत्परता दाखवत महापालिकेने उंदरांचा बंदोबस्त केल्याचे स्पष्ट केले. त्याबाबतचा तब्बल एक कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला गेला. मात्र, ज्या भागात उंदीर सापडले, ते किती होते, त्यासाठी काय यंत्रणा राबविली, मनुष्यबळ किती होते, हाती लागलेल्या उंदरांची कशी विल्हेवाट लावली याचा कोणताही हिशेब महापालिकेकडे आलेल्या प्रस्तावात नव्हता. त्यामुळे नेमके हे प्रकरण काय आहे, यात गैरव्यवहार झाला का, असे प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. त्यावर तुर्त तरी सत्ताधाऱ्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी भाजप यांच्यात उंदरावरूनही नवे राजकारण तापले आहे.
मुंबई महापालिकेतील भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे म्हणाले, १ कोटी रुपयांचे उंदीर मुंबई शहरात मारण्यात आले आहेत. या १ कोटी रुपयांमध्ये किती उंदीर मारले, कोणत्या ठिकाणी मारले, मारलेल्या उंदीरांची विल्हेवाट कशी लावली याबाबत कोणतेच उत्तर प्रशासनाने दिलेले नाही.