मुंबई (Mumbai) : मुंबईत दरवर्षीच्या मुसळधार पावसांत तुंबणाऱ्या पावसामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते. या प्रकल्पावर महापालिकेने आतापर्यंत तब्बल ३,६३८ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली आहे.
मुंबईत २६ जुलै २००५ आलेल्या महापुरानंतर भविष्यातील पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. २००७ मध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारमार्फत महापालिकेने केंद्राला विस्तृत प्रकल्प अहवाल सादर केला. या प्रकल्पाला तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने १२०० कोटींचे विशेष आर्थिक सहाय्य मंजूर केले होते. गेल्या १५ वर्षात ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात दोन टप्प्यांमध्ये कामे करण्याचे प्रस्तावित होते. पहिल्या टप्प्यातील २० मोठ्या नाल्यांच्या रूंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंतींची बांधकामे आदी कामांचा अंतर्भाव होता, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून देण्यात आली.
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाला १९९३ पासून सुरुवात झाली असली, मात्र सन २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतरच खऱ्या अर्थाने वेग आला. महापालिकेने या प्रकल्पावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला आहे. मुंबईतील ताशी ५० मिलिमीटर प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे नियोजन केले. मात्र दरवर्षीच्या मुसळधार पावसांत तुंबणाऱ्या पावसामुळे ब्रिमस्टोवॅडचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येत आहे.
माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागरची जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने हिरवा कंदील दिला आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण व सीआरझेड विभागाची परवानगी मिळणे अशक्य आहे. यासाठी आणखी तीन - चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात गांधी मार्केट, चेंबूर सिंधी सोसायटी, नेहरु नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन परिसरात पाणी तुंबण्याची कटकट कायम राहणार आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी ब्रिमस्टोवॅड अंतर्गत नाल्यांच्या आऊटलेटजवळ ईर्ला, वरळी, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लिव्हलँड, गझदरबंध, मोगरा व माहूल या आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन प्रस्ताावित करण्यात आली होती. त्यापैकी सहा पंपिंग स्टेशन कार्यरत झाली आहेत.