मुंबई (Mumbai) : महापालिकेची मुदत संपत आल्यावर सत्ताधारी शिवसेनेला मुंबईकरांना गेल्या निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची आठवण झालेली दिसते. जसजशी निवडणूक जवळ येतेय तसतसे विविध विकासकामांच्या मूहूर्ताचे नारळ फोडण्यासाठी सत्ताधारी वायु वेगाने कामाला लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून स्थायी समितीत येत असलेले प्रस्ताव पाहून सत्ताधाऱ्यांचा वायूवेगही कमी पडावा असा कारभार दिसून येत आहे. सगळी विकासकामे शेवटच्या टप्प्यातच करायची होती तर पाच वर्षे काय केले असा सवाल केला जात आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत नदी शुध्दीकरण, पाणी पुरवठा, पर्जन्यवाहिन्यांची कामे तसेच कोविड असे मिळून तब्बल 2 हजार कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकी पूर्वी शिवसेनेने मुंबईतील नागरिकांसाठी वचन नामा प्रसिध्द केला होता. त्यात नदी शुध्दीकरण, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय, चौक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण यांसह 500 चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मालमत्ता कर माफीच्या घोषणेवर शिक्कमोर्तब केले आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
महापालिकेची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार आहे. कोविडमुळे निवडणुका कधी होतील याबाबत साशंकता असली तरी आता शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी धडपड सुुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी दहिसर नदीच्या शुद्धीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर पोयर नदीच्या शुद्धीकरणाचाही प्रस्ताव आहे. यावर महापालिका 1 हजार 428 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. त्याच बरोबर कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खर्चाची तरतूद करण्यासाठी निधीचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
100 हून अधिक प्रस्ताव
बुधवारी होणाऱ्या बैठकीत तब्बल 100 हून अधिक प्रस्तावावर चर्चा येणार आहे. या आठवड्यात प्रशासनाकडून 56 प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. तर, मागील आठवड्याची बैठक तहकूब झाल्याने त्यावेळचे सुमारे 50 प्रस्ताव प्रलंबित आहेत.
18 दिवसात चार हजार कोटी
स्थायी समितीने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल 2 हजार 200 कोटीहून अधिकच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर आता बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीत पुन्हा 2 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. अवघ्या 18 दिवसात 4 हजार कोटीहून अधिक खर्चाचा निर्णय होत आहे.
पूरपरिस्थितीसाठी 100 कोटी
पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगर पालिकेने तब्बल 100 कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडले आहेत. यात शहर विभागातील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढविणे, नव्या पर्जन्यवाहिन्या टाकणे अशी कामे करण्यात येणार आहेत तर, हिंदमाता येथील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दादर पूर्व येथील प्रमोद महाजन उद्यानात भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या कामाअंतर्गत दुसरी टाकी बांधण्यासाठी 27 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर, हे तीन प्रस्ताव मिळून 99 कोटी रुपयांचा खर्च होईल.
पाणी पुरवठ्यात सुधारणा
पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी जलवाहिन्या बदलणे, नव्या जलवाहिन्या टाकण्या तसेच सिमेंटच्या रस्त्याखाली गेलेल्या वाहिन्यांचा मार्ग बदलण्यासाठी 79 कोटी 99 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, गिरगाव या भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दुर्गादेशी मैदानात जलशय बांधण्यात आला आहे. या ठिकाणच्या पंपिंगची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. या चार प्रस्तावांसाठी 81 कोटीहून अधिकचा खर्च करण्यात येणार आहे.
उद्यान मैदानांच्या देखभालीसाठी 18 कोटी
मुंबईतील उद्यान, मैदाने, वाहतूक बेटांच्या देखभालीसाठी 18 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.