मुंबई (Mumbai) : निवडणुकीच्या तोंडावर रस्ते दुरुस्तीच्या कामांचा पाऊसच मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीत पडत आहे. यापूर्वी 1 हजार 815 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाल्यानंतर बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या प्रस्तावात 313 कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. कर पकडून हा खर्च 443 कोटी 16 लाखांवर जाणार आहे. यातून आरे कॉलनीतील रस्त्यासह 143 रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 3 कोटी 92 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
मुंबईतील 6 मीटर पेक्षा लहान तसेच काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण आणि डांबरी करण्याचे हे प्रस्ताव आहेत. यावर महापालिका 313 कोटी 84 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. बुधवारी या प्रस्तावावर स्थायी समितीत निर्णय होणार आहे. पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका 180 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. तर, दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 94 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ही कामे दीड ते अडीच वर्षात पूर्ण हाेणार आहेत.
किलोमीटरसाठी 3 कोटी 92 लाख
गोरेगावच्या आरे वसाहतीतील पश्चिम द्रुतगती मार्गापासून पवई येथील मोरारजी नगरपर्यंतचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 38 कोटी 47 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हा 9.8 किलोमीटर लांबीचा रस्ता असून त्याच्या प्रत्येक किलोमीटरच्या कॉंक्रिटीकरणासाठी तब्बल 3 कोटी 92 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
ए, डी, ई या तीन प्रभागातील पदपथांच्या दुरुस्तीचा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. कुलाबा, फोर्ट, ग्रॅन्टरोड, वाळकेश्वर, भायखळा या भागातील 19 पदपथांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यावर महानगर पालिका 18 कोटी 67 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.
पुन्हा कमी दराने टेंडर
महापालिकेने एप्रिल महिन्यात रस्ते दुरुस्तीसाठी मागवलेल्या टेंडरमध्ये कंत्राटदाराने 30 टक्क्यांहून कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे ती टेंडर प्रक्रिया रद्द करुन पालिकेने पुन्हा टेंडर मागविले. मात्र, आताही 13 ते 20 टक्के कमी दराने काम होणार आहे.
टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama
टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama
टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama