मुंबई (Mumbai) : मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील म्हाडा कॉलनी जंक्शन येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लवकरच संपुष्टात येणार आहे. मुंबई महापालिकेने सप्टेंबरमध्ये मुलुंड (पूर्व) मधील पूर्व द्रुतगती मार्ग ते टाटा कॉलनी या नवीन मिसिंग लिंकसाठी आणि मुलुंडमधील आणखी दोन रस्त्यांसाठी ३३ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रकल्पाचा कार्यादेश नुकताच प्रसिद्ध केला आहे. मुलुंडच्या (पूर्व) टाटा कॉलनीला जोडणारी पूर्व द्रुतगती मार्गावर नवीन मिसिंग लिंक तयार करण्यात येत असून त्यामुळे मुलंडच्या रहिवाशांचा सुमारे १५ ते २० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
विकास आराखड्यात येथे ७० मीटर लांबीचा १८.३० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित होता. सर्व आवश्यक मंजुरीसाठी मुंबई महानगर पालिका, नगरविकास विभाग आणि मिठागर आयुक्तांसह सर्व संस्थांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मुलुंड (पूर्व) मधील टाटा कॉलनीला जोडणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरील नवीन मिसिंग लिंक मुलुंड (पूर्व)च्या रहिवाशांना शहरातील प्रवेशाचा मार्ग सुकर करणार आहे. या नवीन मिसींग लिंकमुळे वाहनधारकांना म्हाडा कॉलनी जंक्शन टाळता येईल. जे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध आहे. ही नवीन मिसिंग लिंक कार्यान्वित झाल्यानंतर दैनंदिन हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात स्थानिक आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, पाठपुराव्यानंतर, मुलुंड (पूर्व) मधील टाटा कॉलनीशी जोडणाऱ्या पूर्वद्रुतगती मार्गावरील प्रस्तावित रस्त्यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले होते. या रस्त्यामुळे मुलुंड पूर्वमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे म्हाडा कॉलनी जंक्शन टाळता येणार आहे. ज्यामुळे १५ ते २० मिनिटांचा वेळ वाचेल. या नवीन लिंकमुळे मुलुंडच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोटेचा पुढे म्हणाले की, मिठागर जमीन हस्तांतरित करण्याची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. नगरविकास विभागाकडील पाठपुराव्यानंतर मिठागराची जमीन देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल आणि या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होईल, असे कोटेचा यांनी सांगितले.