मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेचे शिवडी येथील क्षयरोग नियंत्रण रुग्णालयातील अग्नी सुरक्षा यंत्रणा जुनी झाल्याने नव्याने अद्ययावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. टेंडर प्रक्रियेअंती मेसर्स अजंटा इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएलपी या कंपनीला हे काम मिळाले आहे.
क्षयबाधित रुग्णांवर शिवडी येथील या विशेष रुग्णालयात उपचार केले जात असून, येथील रुग्णांच्या तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आग प्रतिबंधक यंत्रणा सक्षम आणि कार्यान्वित असणे आवश्यक आहे. या संदर्भात अतिरिक्त विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या स्थळ निरीक्षण आणि शिफारशीच्या अनुषंगाने या रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी मेसर्स अजंटा इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएलपी ही कंपनी पात्र ठरली आहे.
हे रुग्णालय १२०० खाटांचे विशेष रूणालय आहे. आशियातील सर्वात मोठे असे विशेष क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज सुमारे १००-१५० बाह्यरुग्ण उपचार घेत असतात. रुग्णालयात दररोज ५०-६० रुग्ण दाखल होत असतात. मुंबईत क्षयरोग रुग्णांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त असून, मुंबईत दरवर्षी एमडीआर क्षयरोगबाधित सुमारे ४ हजार रुग्णांची नोंद होते.