मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर आता समितीचा वॉच असणार आहे. पुरवठा करण्यात येणारे अन्नधान्य कशा प्रकारचे यावर समितीची नजर असेल. तसेच तांदूळ कडधान्याचा साठा गोडाऊनमध्ये केल्याने आळ्या, किडे लागतात. त्यामुळे गोडाऊनमध्ये साठा न करता थेट महापालिकेला पुरवठा करा, असे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. मुंबई शहरातील महापालिकेच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांतील एकूण ६ लाख विद्यार्थ्यांना १६० संस्थांच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा करण्यात येतो.
मुंबई महापालिकेच्या शाळांत आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या वर्गातील मुले शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. बेस्ट बसचा मोफत प्रवास, व्हर्च्युअल क्लास रुम, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. महापालिका शाळा व खाजगी अनुदानित शाळांतील एकूण सहा लाख विद्यार्थ्यांना १६० संस्थांच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा करण्यात येतो.
मात्र महापालिकेच्या चेंबूर आणिक गाव येथील मनपा हिंदी शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनात आमटी भात देण्यात आला आणि मध्यान्य भोजनानंतर १६ विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. २४ तास देखरेखीखाली ठेवल्यानंतर प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. या शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवठा करणाऱ्या शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या प्रकरणाचा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. परंतु यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी आता मध्यान्य भोजनाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर समितीचा वॉच असणार आहे. यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पदार्थांचा दर्जा तपासणे, कंत्राटदारांकडून कच्चा मालाचा दर्जा तपासणे अशा प्रकारचा वॉच समितीचा असेल, अशी माहिती डी गंगाथरण, सहआयुक्त शिक्षण विभाग, मुंबई महापालिका यांनी दिली.