मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्टेशन जवळील नवी चिखलवाडी म्हाडा (MHADA) वसाहत अखेरच्या घटका मोजत आहे. येथील ४० वर्षे जुन्या ११ इमारतींचा राज्य सरकारने तातडीने पुनर्विकास करावा, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
पुनर्विकासाच्या मागणीसाठी नवी चिखलवाडीतील रहिवाशांनी अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र पुढे काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी स्थानिक रहिवाशी निखिल घाडी यांच्या पुढाकाराने एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
नवी चिखलवाडीतील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडा प्रशासन तसेच इतर प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकले पाहिजे म्हणून आपण सर्व रहिवाशांनी एकजुटीने पुनर्विकासाचा प्रश्न सोडवायला हवा, असेही बनसोडे यावेळी म्हणाले.
या बैठकीला नवी चिखलवाडी रहिवाशी संघाचे पदाधिकारी यांच्यासह पुनर्विकास क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशांत घाडगे, सतीश लांडगे, संदीप चिंचवडे आदी उपस्थित होते.
येथील इमारतींमध्ये सुमारे सव्वापाचशे कुटुंबे राहतात. म्हाडाची ही वसाहत मोडकळीस आली असून अनेकवेळा येथील इमारतींचा स्लॅब खचून अपघात झालेला आहे. मुंबई शहरातील मुख्य भागात राहणाऱ्या मराठी कुटुंबांकडे म्हाडा तसेच राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे जीवितहानीच्या भीतीमुळे या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ आली आहे.