मुंबई (Mumbai) : नवी दिल्ली (New Delhi) ते मुंबई एक्सप्रेसचा वेग 160-200 किमीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रवास 12 तासांवर आणण्यावर भर दिला जात आहे. या प्रकल्पाचा खर्च 6 हजार 600 कोटी रुपये आहे. तर यंदा या प्रकल्पासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे या तुटपुंज्या निधीत मुंबई दिल्लीतील अंतर कसे कमी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला 9 हजार 149 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामधील 'मिशन रफ्तार'अंतर्गत पश्चिम रेल्वेवरील नवी दिल्ली ते मुंबई प्रवास वेगात होण्यासाठी विशेष तरतूद केली आहे.
मुंबई ते नवी दिल्लीचा बडोदा-अहमदाबाद मार्गे रेल्वे प्रवास कमी तासांत होण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपाययोजना सुरु आहेत. त्यासाठी सुरक्षित डबे, रेल्वे मार्गाची क्षमता वाढविणे, पादचारी पूल, संरक्षक भिंत, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेसह इतर कामांवर लक्ष दिले जात आहे.
मुंबई-दिल्ली-कोलकत्ता-चेन्नई या सुवर्ण चतुष्कोनातून देशातील 60 टक्के प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर कमी कालावधी होण्यासाठी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात येणार आहे. सध्या ताशी 130 किमी वेगाने एक्स्प्रेस धावत असून हा वेग 160 ते 200 ताशी किमीने चालविण्याचा पश्चिम रेल्वेचा ध्यास आहे. मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गावरुन राजधानी एक्स्प्रेससह 30 हून अधिक एक्स्प्रेस धावतात. सध्या मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी 15 ते 16 तास लागतात. तर, 160 ते 200 ताशी वेगाने एक्स्प्रेस धावल्यास हा प्रवास 11 ते 12 तासांत पूर्ण होणे सोपे होईल.
मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गाचा वेग वाढविण्याच्या प्रकल्पाचा खर्च 6 हजार 600 कोटी रुपये आहे. यंदा या प्रकल्पासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. या कामांसाठी 56 निविदांपैकी 75 टक्के निविदा काढण्यात आल्या आहेत. बाकी टेंडरची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.