मुंबईकरांसाठी गुड न्यूज : कोस्टल रोडचे 91 टक्के काम पूर्ण; 'तो' तिसरा टप्पा खुला

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा ३.५ किलोमीटरचा तिसरा टप्पा आज, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला करण्यात आला. त्यामुळे आता उत्तरेकडे प्रवासासाठी मरीन ड्राईव्ह ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा एकूण ९.७५ किलोमीटरचा टप्पा उपलब्ध झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची बुधवारी (ता.१०) प्रत्यक्ष पाहणी केली.

Eknath Shinde
EXCLUSIVE : शिंदे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत? केसरकरांच्या खात्यात कायद्याची ऐसीतैसी!

किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी अली (लोटस जंक्शन) ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा तिसरा टप्पा आज ११ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता खुला करण्यात आला. हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा टप्पा बंद राहील. सागरी सेतूपर्यंत जाण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरुपाचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदींसह अभियंते, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde
Devendra Fadnavis : सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर नाहीतच; असे का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दौऱ्याच्या प्रारंभी महापालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकल्पाविषयी तसेच टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या मार्गिकांची माहिती दिली. हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण ३.५ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात आज ११ जुलै २०२४ सकाळी ७ वाजेपासून ही मार्गिका खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेवरुन पुढे जावून फक्त सागरी सेतूकडे जाता येईल. (वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ.अ‍ॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा.) यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. प्रकल्पातील विविध टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत तसतसे ते वाहतुकीसाठी खुले करून दिले जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी प्रकल्पाचे काम होत असताना वाहतुकीला देखील वेग मिळतो आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्पापैकी ९१ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले. 

Eknath Shinde
Mumbai : 'त्या' महापालिकेने मंजूर केलेले 44 बांधकाम प्रकल्प रद्द करावेत; चौकशीचीही मागणी

बृहन्मुंबई महापालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सी लिंक) टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आजतागायत ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी व वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी प्रकल्पामधील पूर्ण झालेले टप्पे एका पाठोपाठ खुले करण्यात येत आहेत. सर्वात आधी ११ मार्च २०२४ रोजी दक्षिणेला प्रवासाची सुविधा देणारी बिंदूमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह ही ९.२५ किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका खुली करण्यात आली होती.

त्यानंतर उत्तर दिशेने प्रवासाची सुविधा देण्यासाठी १० जून २०२४ रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोट्स जंक्शनपर्यंत सुमारे ६.२५ किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला होता. आता हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत सुमारे ३.५ किलोमीटरचा तिसरा टप्पा तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांच्या सोयीसाठी खुला करण्यात येत आहे. याचाच अर्थ उत्तरेकडे प्रवासासाठी मरीन ड्राईव्ह ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा एकूण ९.७५ किलोमीटरचा टप्पा उपलब्ध होणार आहे. खान अब्दुल गफार खान मार्गावर प्रवेश केल्यानंतर तेथून पुढे राजीव गांधी सागरी सेतू (वरळी वांद्रे सागरी सेतू) वर प्रवेश करणे शक्य होणार आहे. मरीन ड्राईव्हवरून थेट सागरी सेतूपर्यंत जलद प्रवास करता येईल. वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ.अ‍ॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा नागरिकांनी वापर करावा.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com