मुंबई (Mumbai) : नरिमन पॉईंट ते विरार हे अडीच तासांचे अंतर लवकरच ३५ ते ४० मिनिटांत गाठता येणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तार विरारपर्यंत करण्यात येत आहे. कोस्टल रोडच्या विस्तारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. कोस्टल रोडचा विरारपर्यंत विस्तार करण्यासाठी 'जायका' तब्बल ५४ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
मुंबईतील नरिमन पॉईंटपासून निर्माणाधीन कोस्टल रोड हा मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण होईल. यापूर्वीच वर्सोवा ते मढ लिंकसाठी टेंडर काढण्यात आले असून मढ ते उत्तन लिंकचे कामही लवकरच सुरू होणार आहे. कोस्टल रोड हा मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील 8 लेनचा 29.2 किलोमीटर लांबीचा स्वतंत्र एक्सप्रेस वे आहे. जो दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवलीला जोडतो. कोस्टल रोडचा पहिला टप्पा 11 मार्च 2024 रोजी सुरू झाला. हा मार्ग प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत 10.58 किलोमीटरचा आहे.
कोस्टल रोड हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात आले आहे. प्रकल्पामध्ये 4+4 मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 11 मार्च रोजी वरळी आणि दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह दरम्यान पहिला टप्पा सुरू करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईसोबत जोडणारा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान दुसऱ्या बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे लोकार्पण 10 जून 2024 रोजी करण्यात आले. पहिला 9 किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. 10 जून 2024 पासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे.
किनारी रस्त्यामुळे वेळेत 40 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत होणार आहे. किनारी रस्त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान उंचावेल. हरित क्षेत्रामध्ये- सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, फुलपाखरु उद्यान, जैव वैविध्यता उद्यान इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पामध्ये 8.5 किलोमीटर सागरी पदपथ निर्मिती. किनारी रस्त्यावर समर्पित बस वाहतुकीचे नियोजन असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल व संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल. रुग्णवाहिन्यांसाठी जलद प्रवास. प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा व पुरापासून संरक्षण. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे -
- 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका सुरू
- 10 जून रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी उत्तरवाहिनी मार्गिका सुरू
- 11 जुलै रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका (तात्पुरत्या स्वरुपात, 3.5 किलोमीटर) सुरू